कोविड लसीकरणानंतर भारतात हार्ट अटॅकच्या प्रकरणात वाढ? ICMR शोधतंय या 3 प्रश्नांची उत्तरं
कोरोना महामारीने तब्बल दोन वर्ष थैमान घातलं. लसीकरणाद्वारे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आलं खरं, पण आता नवीनच समस्या निर्माण झाली आहे. लसीकरणामुळे हार्टअटॅकच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Covid Vaccination : 2019 मध्ये चीनमध्ये कोरोनाने (Corona) महामारीला सुरुवात झाली आणि हळूहळू संपूर्ण जगभरात या महामारीने थैमान घातलं. 2020 मध्ये परिस्थिती आणखी बिघडली आणि भारतासह अनेक देशांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) लावण्यता आलं. महामारी आटोक्यात आणण्यासाठी व्हॅक्सीन (Vaccination) आणण्याचे प्रयत्न सुरु झाले. शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांतर कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यात यश आलं. 2021 मध्ये लसीकरणाला सुरुवात झाली. भारतातही अनेक कंपन्यांच्या लसी उपलब्ध झाल्या. 2022 मध्ये भारतात जास्तीत जास्त लोकांना लस देण्यात आली. पण यानंतर गेल्या काही महिन्यात अचानक हार्ट अटॅकच्या (Heart Attack) प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे.
2021 मध्ये कोरोना महामारीने गंभीर रुप धारण केलं, याला आवर घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम राबवण्यात आली. पण यादरम्यान देशभरात अनेकांचा मृत्यूही झाला. यातल्या काही जणांचा कोरोनामुळे तर काही जणांचा मृत्यू हार्ट-अटॅक आणि इतर आजारामुळे झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे लसीमुळे हार्टअटॅकच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला.
ICMR चा अभ्यास
लसीकरणानंतर हार्टअॅटकच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या आरोपांनंतर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) एक अभ्यास करत आहे. या अभ्यासाचा अहवाल जुलै 2023 मध्ये प्रकाशित होणार आहे. देशात विशेषत: तरुण वर्गात कोविड-19 लसीकरणानंतर हार्ट अटॅकच्या घटना वाढल्या आहेत का? यावर अभ्यास केला जात आहे. सखोल अभ्यास आणि पुराव्यानंतरच याचा अहवाल प्रसिद्ध केला जाणार आहे.
या प्रश्नांच्या उत्तराचा शोध
1. लसीकरणानंतर लोकांचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला आहे का?
2. कोविडसाठी बनवलेली लस मृत्यूचं कारण ठरली आहे का?
3. मृत्यू झालेले रुग्ण कोविडच्या शेवटच्या टप्प्यात होते का?
या प्रश्नांच्या शोधासाठी ICMR ने देशभरातील 40 रुग्णालयातून वैद्यकीय नोंदणींचा अभ्यास केला आहे. शिवाय AIIMS मधूनही काही रुग्णांचा डाटा गोळा करण्यात आला आहे. कोरोनानंतर हार्टअटॅकच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनीही एका मुलाखतीत सांगितलं होतं. इंडियन हार्ट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार 50 वर्षाहून कमी वयोगटातील 50 टक्के, 40 वर्षाहून कमी वयोगटातील 25 टक्के लोकांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं दिसून आली आहेत. म्हणजे तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे. विशेष म्हणजे महिलांच्या तुलनात पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आहे. ब्लड प्रेशर, शुगर, तणाव, लठ्ठपणा आणि अनियमीत जीवन शैली ही हार्ट अटॅकची प्रमुख लक्षणं आहेत.