AstraZeneca Covid Vaccine Side Effects: संपूर्ण जगाने जवळपास 3 वर्ष कोरोनाच्या महामारीचा सामना केला. कोरोना महामारीपासून बचाव व्हावा यासाठी लोकांना लस देण्यात आली. दरम्यान यावेळी ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेका लस लोकांना देण्यात आली होती. आपल्या भारतात अदार पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली होती. देशभरातील अनेकांनी ही लस घेतली. साथीच्या आजारानंतर जवळपास 4 वर्षांनी AstraZeneca ने आता कबूल केलंय की, या लसीचे लोकांमध्ये दुर्मिळ दुष्परिणाम दिसून येऊ शकतात.


कोविशील्ड लसीमुळे हार्ट अटॅकचा धोका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कायदेशीर प्रकरणात, AstraZeneca ने कबूल केलं आहे की, कोविशील्ड आणि वॅक्सजेव्हरिया या ब्रँड नावाने जगभरात विकल्या जाणाऱ्या कोरोना लसीमुळे ब्लड क्लॉट्स होण्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. याशिवाय यामुळे हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. कंपनीने असंही सांगितलंय की, हे केवळ अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये होईल आणि सामान्य लोकांना घाबरण्याची गरज नाही.


ब्रिटनमध्ये जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीने AstraZeneca कंपनीविरोधात कोर्टात केस दाखल केली आहे. या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, ॲस्ट्राझेनेकाची लस दिल्यानंतर मेंदूला हानी पोहोचल्याचं दिसून आलं. इतर अनेक कुटुंबांनीही लसीच्या दुष्परिणामांबाबत न्यायालयात तक्रारी केल्या आहेत. 


AstraZeneca ने काय दिली नेमकी कबूली?


यूके उच्च न्यायालयात उत्तर देताना, कंपनीने मान्य केलंय की, अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये त्यांच्या लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) होऊ शकतो. यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. ही कबुली देऊनही कंपनी लोकांच्या भरपाईच्या मागणीला विरोध करत आहे. कंपनीचे म्हणण्यानुसार, इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्यानंतर ही समस्या काही लोकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. 


कंपनीला द्यावी लागू शकते भरपाई


AstraZeneca-Oxford ही लस सुरक्षिततेच्या कारणास्तव यूकेमध्ये दिली जात नाही. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा दावा मान्य केल्यास कंपनीला मोठी रक्कम भरावी लागू शकते. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पहावं लागणार आहे.