मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय शी जिनपिंग यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार आता मच्छीमारच नाही तर मासे आणि खेकड्यांची तपासणी करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना चाचणीशिवाय एकही मासा किंवा इतर सीफूड देशात येऊ देऊ नये, अशी सरकारची सक्त सूचना आहे. मात्र, मासे आणि खेकड्यांच्या कोरोना तपासणीची ही बातमी आणि व्हिडिओ चीनच्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.


मासे आणि खेकड्यांचीही कोरोना टेस्ट 


कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढू लागली, तर चीननेही मासे आणि खेकड्यांची कोरोना तपासणी सुरू केली आहे. साऊथ-चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या माहितीप्रमाणे, आता तिथल्या सरकारने समुद्रातून येणाऱ्या सर्व मासे आणि खेकड्यांची कोविड चाचणी करण्याचे आदेश जारी केले आहेत.


चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आलंय. पण तरीही अलीकडे ज्या प्रकारे कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत, त्यानंतर अशी अनपेक्षित पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. 


एका इंग्रजी वेबसाईटच्या म्हणण्यानुसार, चीनमधील झियामेनमध्ये परिस्थिती अशी आहे की 5 दशलक्षाहून अधिक लोकांना चाचणी घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात. पण, माणसांसह समुद्रातील मासे आणि खेकड्यांची कोरोना चाचणी ऐकून लोकंही थक्क झाले आहेत.



सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल


साऊथ-चायना मॉर्निंग पोस्टने आपल्या ट्विटर हँडलवर चीनच्या सोशल मीडियावर चालणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये आरोग्य कर्मचारी कोविड विषाणूची लागण झाल्याचा संशय असलेल्या सीफूडचे नमुने घेताना दिसतायत


आरोग्य कर्मचारी पूर्णपणे पीपीई किटमध्ये आहेत आणि माणसांप्रमाणेच माशांच्या तोंडातून स्वॅब घेत आहेत. तर खेकड्यांच्या टरफल्यांचे नमुने गोळा केले जातायत. हा व्हिडिओ संपूर्ण चीनमध्ये व्हायरल झाला असून त्यावरून जोरदार चर्चा सुरू झालीये.