जुळ्यांना जन्म दिला पण ते सुख अनुभवण्यासाठी `आई` करतेय जीवनाशी संघर्ष ...
एका जीवाला जन्म देण्याची ताकद ही केवळ स्त्रीमध्येच आहे. त्या जीवाच्या जन्मानंतर केवळ एक आईच त्याला गरजेची असते. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये प्रसुतीमध्ये अनेक अडचणी येणे किंवा आई किंवा बाळाला धोका असणे अशा गोष्टी घडतात.
मुंबई : एका जीवाला जन्म देण्याची ताकद ही केवळ स्त्रीमध्येच आहे. त्या जीवाच्या जन्मानंतर केवळ एक आईच त्याला गरजेची असते. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये प्रसुतीमध्ये अनेक अडचणी येणे किंवा आई किंवा बाळाला धोका असणे अशा गोष्टी घडतात.
मुंबईत एका आईची कहाणी अशी आहे की जिची दोन बाळं जगात आल्यावर आपल्या आईपासूनच लांब आहेत. आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे मुंबईतील या महिलेला जुळ्या मुलांची चाहुल लागली. त्यानंतर तिची प्रसूती ही सिझेरियन पद्धतीने झाली. सिझेरियन झाल्यानंतर काही वेळात ही महिला कोमामध्ये गेली. बाहेरचे जग पाहिल्यावर या जुळ्या बाळांनी आपल्या आईचा स्पर्शदेखील अनुभवला नाही. मुंबईतील एका रूग्णालयात या महिलेची प्रसूती झाली व कोमामध्ये गेली. कोमामध्ये गेल्यावर या महिलेला डॉक्टरांनी जसलोक रूग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
जसलोकमध्ये आल्यानंतर या महिलेच्या काही टेस्टनंतर तिच्या मेंदूमध्ये इजा असल्याचे निदर्शनास आले. जसलोक रूग्णालयातील न्युरोसर्जरी विभागाचे संचालक डॉ. परेश दोषी यांच्या अधिपत्याखाली तसेच जपानी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या महिलेवर डीबीएस अर्थात डिप ब्रेन स्टिम्युलेशन सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्लोबल हायपोक्सिक अशी मेंदूची दुखापत या महिलेला झाल्याने डीबीएस करण्याचा निर्णय डॉ. दोषी व टीमने घेतला. जानेवारीमध्ये या महिलेची प्रसूती झाल्यानंतर ती कोमामध्ये होती. मात्र 2 महिने तिची काहीच प्रगती नसल्याने अखेर हा निर्णय घेतला गेला.
'अनेक रूग्णांवर डीबीएस सर्जरी केल्यानंतर कोमामध्ये असलेल्या रूग्णावर डीबीएस सर्जरी करणे हे कदाचित पहिल्यांदाच झाले आहे. तेव्हा हे मी व माझ्या टीमसाठी एक आव्हान होते, कारण या महिलेवर तिच्या 2 बाळांची जबाबदारी आहे' असे डॉ. परेश दोषी यांनी सांगितले. डीबीएस हे मज्ज्संस्थेबाबत असलेले एक क्लिष्ट व प्रगतशील तंत्रज्ञान आहे. केवळ जीवन कालावधी वाढवण्यासोबतच रुग्णांसाठी जीवनाची गुणवत्ता सुधारण्याची आशा यामुळे वाढू शकते.