लग्नाच्या जेवणाचा त्रास टाळण्यासाठी ऋजुता दिवेकरच्या खास टीप्स
सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे.
मुंबई: सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे.
अनेकजण एका दिवसाला दोन ठिकाणी लग्नाला जातात. तर अनेकांना लग्नापेक्षा त्यामधील जेवणाची चव चाखायण्यामध्ये अधिक इंटरेस्ट असतो. पण रात्री उशिरा आणि बुफे पद्धतीमध्ये जेवणाची सवय आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.
लग्नाचा सोहळा हा खास असल्याने अनेकदा टाळतादेखील येत नाही. म्हणूनच लग्नाच्या जेवणाची चव आणि तुमच्या आरोग्याचं गणित राखण्यासाठी सेलिब्रिटी आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांच्या सल्ल्याने नक्की पाळा.
लग्नाच्या जेवणानंतर कोणती पथ्य पाळावी ?
छास -
अनेकदा लग्नाच्या जेवणं जड असतं पण त्याच्यामुळे भूक शमतेच असे नसते. अनेकदा जेवताना खूप जेवल्यासारखे वाटते पण पुन्हा परत भूक लागते. अशावेळेस ग्लासभर छास प्यावे. त्यामध्ये काळं मीठ आणि हिंग अवश्य मिसळा.
दुपारच्या जेवणानंतर छास प्यावे. यामधून व्हिटॅमिन बी 12 आणि प्रो बायोटिकचा पुरवठा होतो. चिमुटभर हिंग आणि काळ्या मीठामुळे ब्लोटिंग ( पोटफुगीचा), पचनाचा त्रास होण्याचा धोका कमी होतो.
खास टीप - संध्याकाळच्या वेळेस तुम्ही एखाद्या सोहळ्यामध्ये सहभागी होणार असाल आणि त्यावेळेस पोटफुगीचा त्रास होऊ नये असे वाटत असल्यास हा उपाय नक्कीच फायदेशीर आहे.
च्यवनप्राश -
हिवाळ्याच्या दिवसात लग्नाचा मौसम असतो. अशावेळी वातावरणातील बदल आणि लग्नाचे जेवण याचा त्रास होऊ नये म्हणून च्यवनप्राश चाखावे. च्यवनप्राशमुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारायला मदत होते. यामध्ये फ्लॅवोनॉईड्स आणि अॅन्टीऑक्सिडंट्स मुबलक असतात. हिवाळ्यात त्वचेचा पोत राखायलादेखील च्यवनप्राश मदत करते.
खास टीप - रात्रीच्या वेळचे आणि डेस्टिनेशन वेडिंगमध्ये तुम्ही सहभागी होणार असाल तर अवश्य तुमच्याजवळ च्यवनप्राश ठेवा.
मेथीचे लाडू -
हिवाळयाच्या दिवसामध्ये मेथीचे लाडूदेखिल अवश्य खावेत. यामध्ये गूळ, सुंठ आणि तूपाचा समावेश असतो. यामुळे बद्धकोष्ठता, पोटफुगी, पचनाचा त्रास आटोक्यात राहतो. हिवाळ्याच्या दिवसात मेथीचे लाडू खाल्ल्यास केसांचे आरोग्य जपायलादेखील मदत होते.
खास टीप - ब्रेकफास्ट किंवा 4-6 या वेळेदरम्यान काही खाण्याची इच्छा झाल्यास मेथीचे लाडू अवश्य खावेत. तुमच्या झोपेचे चक्र किंवा व्यायाम चुकणार असेल तर मेथीचे लाडू खायला हवे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.