तोंड उघडल्यावर यायचा शिट्टीचा आवाज; प्रकरण पाहून डॉक्टरही चक्रावले!
जेव्हा मुलाने तोंड उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिट्टीचा आवाज ऐकू येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
कोलकाता : पश्चिम बंगालमधील कोलकातामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका 12 वर्षांच्या मुलाने चुकून प्लॅस्टिकची शिट्टी गिळली. ही शिट्टी या मुलाच्या फुफ्फुसात अडकली. कोलकात्याच्या सरकारी एसएसकेएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ऑपरेशन करून या मुलाच्या फुफ्फुसातून शिटी काढली आहे. मुख्य म्हणजे फुफ्फुसात शिटी अडकली असूनही 11 महिने हा मुलगा जिवंत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.
चुकून शिट्टी गिळली होती
एसएसकेएम रुग्णालयातील इन्स्टिट्यूट ऑफ ऑटोरहिनोलॅरिन्गोलॉजी आणि डोके व मान सर्जरीच्या डॉक्टरांनी सांगितलं की, दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बरुईपूरमध्ये रहात असलेल्या रेहान लस्करने जानेवारीमध्ये बटाट्याचे चिप्स खाताना चुकून प्लास्टिकची शिट्टी गिळली.
तोंड उघडलं की यायचा शिट्टीचा आवाज
डॉक्टरांनी सांगितलं की, शिट्टी गिळल्यानंतर जेव्हा मुलाने तोंड उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिट्टीचा आवाज ऐकू येत होता. सुरुवातीला मुलाच्या पालकांच्या लक्षात आलं नाही की मुलाला नेमकं काय होतंय.
त्यानंतर मुलाच्या वडिलांच्या लक्षात आलं की, रेहानला छातीत दुखत होतं आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर रेहानच्या नातेवाईकांनी त्याला नॅशनल मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथून त्याला एसएसकेएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.
मुलाला छातीत दुखू लागलं
रेहानच्या वडिलांनी सांगितले की, जेव्हा त्यांच्या मुलाने शिट्टी गिळली तेव्हा त्याने घरातील कोणालाही काहीही सांगितलं नाही. त्यानंतर छातीत दुखू लागल्यावर त्याने घरी याबाबत सांगितलं.
डॉक्टरांनी सांगितलं की, आम्ही मुलाचा एक्स-रे आणि सीटी स्कॅन केला. त्यानंतर मुलाच्या फुफ्फुसात शिटी अडकल्याचं दिसून आले. त्यानंतर मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आम्ही ब्रॉन्कोस्कोपी केली आणि नंतर Optical Forcep वापरून सीटी बाहेर काढण्यात आली.