वैद्यकीय क्षेत्राचं मोठं नुकसान, पाहा कोरोनामुळे देशाने किती डॉक्टर गमावले?
कोरोनाची दुसरी लाट भयंकर असून दुसऱ्या लाटेमध्ये अनेक डॉक्टरांचा बळी गेला आहे
मुंबई : संपूर्ण देशभरावर सध्या कोरोनाचं महाभयंकर संकट आहे. देशात कोरोना रूग्णांची एकूण संख्या 2 कोटींच्या पार गेली आहे. तर मृत्यूचा आकडा 3 लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनाची दुसरी लाट भयंकर असून दुसऱ्या लाटेमध्ये 594 डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. बुधवारी आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनने ही माहिती दिली आहे. तर महाराष्ट्रात 17 डॉक्टरांचा बळी गेला असल्याची माहिती आहे.
देशातील एकूण ड़क्टरांच्या मृत्यूंमध्ये राजधानी दिल्लीमध्ये सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये 107 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल बिहारमध्ये 96, उत्तर प्रदेशमध्ये 67 डॉक्टरांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यानंतर राजस्थानमध्ये 43, झारखंडमध्ये 39, आंध्र प्रदेशमध्ये 32, तेलंगणामध्ये 32, गुजरातमध्ये 31 आणि पश्चिम बंगालमध्ये 25 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
तर देशातील 4 राज्यांमध्ये 25हून कमी डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद केली गेली आहे. यामध्ये ओडिशा 22, तामिळनाडू 21, महाराष्ट्र 17, मध्य प्रदेश 16 इतक्या डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान नुकतंच आसाममध्ये कोरोना रूग्णाच्या मृत्यूनंतर एका ज्युनियर डॉक्टरला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीनंतर 24 लोकांना अटक देखील करण्यात आली आहे. या मारहणीच्या प्रकारानंतर आयएमएने गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून डॉक्टर मारहाणीविरोधात कडक कायदा करण्याची मागणी केली आहे.