तुमच्या हेल्थ इन्श्यूरन्समध्ये HMPV व्हायरसचा इलाज होतो का? कोरोनावेळची ती चूक पुन्हा करु नका!
Medical Insurance On HMPV: भारतात आतापर्यंत एचएमव्हीपीचे 8 रुग्ण आढळले आहेत.
Medical Insurance On HMPV: भारतासह जगात कोरोनाने हाहाकार माजवला होता. कोरोनाचा संसर्ग हवेतून वेगाने पसरत होता. यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले होते. या काळाने नागरिकांना आरोग्याची काळजी आणि आरोग्य विम्याचे महत्व पटवून दिले. आता या घटनेला साधारण 5 वर्षे झाली असतील आणि चीनमधून आलेला आणखी एक व्हायरस भारताचं दार ठोठावतोय. याची भारतासह इतर देशांमध्ये एचएमपीव्ही विषाणू पसरत आहे. अचानक आलेल्या कोरोना लॉकडाऊनच्या काळात हेल्थ इन्श्यूरन्सची आठवण झाली होती. त्यावेळी अनेक कंपन्यांनी कोरोनासाठी आरोग्य विमा फायदे देण्यास नकार दिला होता. यामुळे रुग्णांना डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ आली होती. आता एचएमव्हीपी तरी आरोग्य विम्यात मोडतो का? असा प्रश्न नागरिकांना पडलाय.
भारतात आतापर्यंत एचएमव्हीपीचे 8 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 2 रुग्ण तामिळनाडूतील, 2 कर्नाटकातील, 3 महाराष्ट्रातील आणि 1 रुग्ण गुजरातमधील आहे. समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार यापैकी एक मुलगी एचएमव्हपी विषाणूवर मात करुन बरीदेखील झाली आहे. एचएमपीव्हीच्या वाढत्या घटनांमध्ये अनेक लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोग्य विमा (वैद्यकीय विमा) या विषाणूच्या उपचारांना कव्हर करतो का? हा प्रश्न तुम्हालादेखील पडला असेल तर याचे उत्तर जाणून घेऊया.
आरोग्य विम्यात एचएमपीव्ही विषाणूच्या उपचाराचा समावेश?
एचएमपीव्हीचा उपचार मानक श्वसन आजारांतर्गत समाविष्ट आहे. यामध्ये हॉस्पिटलायझेशनचा खर्च, पीसीआर आणि श्वसन रोगजनकांच्या निदान चाचण्या, बाह्यरुग्ण सल्लामसलत आणि उपचारांचा समावेश असतो. त्यामुळे एचएमव्हीपीचा आरोग्य विमा योजनांमध्ये समावेश होतो, असे मत ऑनस्युरिटीच्या मुख्य क्लेम ऑफिसर सुमन पाल यांनी व्यक्त केले आहे. यासोबतच आयसीयू प्रवेश, ऑक्सिजन थेरपी आणि रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुनर्प्राप्तीचा खर्चाचादेखील अनेक आरोग्य योजनांमध्ये समावेष आहे. अतिदक्षता आणि दीर्घकाळ वैद्यकीय मदतीची आवश्यकता असलेल्या रुग्णांचाही काही आरोग्य योजनांमध्ये विचार केला जातो.
सरकारकडून प्रयत्न
केंद्र सरकार देखील एचएमपीव्हीबाबत सतर्क आहे. सर्व राज्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व राज्यांना इन्फ्लूएंझा संसर्ग आणि तीव्र श्वसन संसर्गाच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्याचे आणि एचएमपीव्हीच्या बाबतीत जागरूकता निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.अलिकडेच केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी एचएमपीव्ही विषाणूबाबत एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. त्यात नड्डा सांगतात, एचएमपीव्ही हा नवीन विषाणू नाही, तो पहिल्यांदा 2001 मध्ये ओळखला गेला असून तो अनेक वर्षांपासून जगभर पसरत आहे. एचएमपीव्ही एक सामान्य विषाणू आहे. त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय आणीबाणीसाठी देश पूर्णपणे सज्ज असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री नड्डा म्हणाले.