मासिकपाळीच्या दिवसातील वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय
मासिकपाळी हे मुलगी वयात आल्याचं एक लक्षण आहे.
मुंबई : मासिकपाळी हे मुलगी वयात आल्याचं एक लक्षण आहे. आजकाल मुलींमध्ये मासिकपाळी येण्याचं वय कमी झालं आहे. त्यामुळे मासिकपाळीचा वेदनादायी त्रास दूर करण्यासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल करणं आवश्यक आहे. अनेकजणी मासिकपाळीच्या वेदना दूर करण्यासाठी पेनकिलरची मदत घेतात. मात्र त्याचा आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतो.
औषधगोळ्यांव्यतिरिक्तदेखील काही घरगुती आणि सुरक्षित उपायांनी मासिकपाळीचा त्रास आणि वेदना कमी करता येऊ शकतात. मासिकपाळीच्या काळात काही विशिष्ट हार्मोन्समुळे गर्भाशय आकुंचन पावते आणि त्यामुळे वेदना होतात.
मासिकपाळीचा त्रास दूर करण्यासाठी आलं फायदेशीर -
आल्यातील ‘जिंजरॉल्स’ घटक हार्मोन्सची निर्मिती रोखते आणि वेदनांपासून आराम मिळतो. आल्यामुळे शरीरातील पित्ताचे प्रमाण कमी होते. यामुळे देखील मासिकपाळीचा त्रास कमी होतो.
कसा कराल आल्याचा वापर
आल्याचा चहा / काढा :
कपभर चहा बनवताना त्यात किसलेलं आलं, चहापावडर, साखर टाकून पाणी उकळावे. 5-10 मिनिटे चहा उकळ्यानंतर तो गाळून प्यावा. यामुळे मासिकपाळी उशीरा येणे, मासिकपाळीच्या काळातील वेदना अशा समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते.
मासिकपाळीचा त्रास होत असल्यास दिवसभर थोड्या-थोड्या वेळाने आल्याचा काढा प्यावा.