तुम्हाला हे माहित आहे का? गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं, आरोग्यासाठी घातक!
गरजेपेक्षा जास्त पाणी पिणंही आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं.
मुंबई : आपल्या सर्वांना माहिती आहे की पाणी पिणं हे शरीरासाठी फार गरजेचं असतं. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायलं नाही, तर शरीर थकल्यासारखं दिसतं. अनेक समस्याही उद्भवण्याची शक्यता असते. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनचा त्रास अनेकांना होता दिसतो. पाणी प्यायल्याने शरीरातील ओलावा टिकून राहतो आणि त्वचा हेल्दी तसंच फ्रेश दिसून येते. उन्हाळ्याच्या दिवसांत आपण अधिकाअधिक पाणी पितो. त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसांत त्रास होऊ नये म्हणून आपण पाण्यासोबत विविध प्रकारचे ड्रिंक्सही पितो. मात्र तुम्हाला माहिती आहे का गरजेपेक्षा जास्त पाणी पिणंही आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं.
उन्हाळ्याच्या दिवसांत अधिक प्रमाणात तहान लागते. मात्र कोणतीही गोष्ट जास्त खाणं किंवा पिणं शरीरासाठी धोकादायक असतेच. त्याचप्रमाणे गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं धोकादायक ठरू शकतं. याला वॉटर इनटॉक्सिकेशन किंवा वॉटर पॉयझनिंग म्हटलं जातं. यादरम्यान रक्तात ऑक्सिजनची लेवल वाढते ज्यामुळे मृत्यू होण्याचा धोका ओढावू शकतो.
गरजेपेक्षा जास्त पाणी पिण्याबद्दल माहिती देताना नागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमधील डॉ. शुभम इंगळे म्हणाले, "एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 3 ते 4 लीटर पाणी पिऊ शकते. मुख्य म्हणजे ज्या व्यक्तींना कंजेस्टिव्ह हार्ट फेल्यूअर, क्रोनिक किडनी डिसीज किंवा लिव्हर सिरॉसिस असे त्रास असतील त्यांनी प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे."
डॉ. शुभम इंगळे पुढे म्हणाले, "अशा व्यक्तींनी अधिक पाणी प्यायल्यास हे आजार वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे सामान्य व्यक्तींनी पाणी प्यायल्यास शरीरातील सोडियमची मात्रा कमी होते. यामुळे थकवा किंवा डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते. सोडियम कमी होणं काही जीवासाठीही धोकादायक ठरू शकतं."
गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने ओव्हरहायड्रेशनची समस्या बळावू शकते. याचा परिणाम किडनीवर होतो. किडनी शरीरातील पाण्याला फिल्टर करण्याचं काम करते. त्यामुळे जास्त पाणी प्यायल्यास किडनीवर परिणाम होऊन किडनी फेल होण्याचा धोकाही बळावतो.