मासिक पाळीमध्ये बिनधास्त खा दही...होतील अनेक फायदे!
मासिक पाळीच्या कालावधी दही खाल्ल्याने बरेच फायदे होतात.
मुंबई : मुलींना मासिक पाळीदरम्यान अनेक नियमांचं पालन करण्यास सांगितलं जातं. मात्र आता काळ बदलल्यामुळे बहुतांश मुली याकडे दुर्लक्ष करतात. मात्र अजूनही काही ठिकाणी मुलींना मासिक पाळीदरम्यान काही नियमांचं पालन करावं लागतं. असंच मासिक पाळीच्या कालावधीत दह्यासारखे आंबट पदार्थ खाऊ नये, असं सांगण्यात येतं. मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मासिकपाळी दरम्यान दह्याचं सेवन करावं.
दूध, दही तसंच ताक हे कॅल्शियमचे उत्तम स्रोत मानले जातात. स्त्रियांमध्ये कॅल्शियमची कमतरता अधिक प्रमाणात दिसून येते. यासाठीच आहारात दूधाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. महिलांनी मासिक पाळीच्या काळात दही खाऊ नये त्यामुळे वेदना वाढतात असं मानलं जातं.
मासिक पाळीच्या काळात दही किंवा कोणतेही इतर आंबट पदार्थ खाल्लं तर वेदना वाढतात असा समज आहे. पण आहार तज्ज्ञांचं म्हणण्याप्रमाणे हे अयोग्य असून एकदम विरुद्ध आहे. मासिक पाळीच्या कालावधी दही खाल्ल्याने बरेच फायदे होतात.
मासिक पाळीत दहीच्या सेवनाचे फायदे?
मासिक पाळीच्या काळात महिलांनी ताजं दही खाल्ल्याने वेदना कमी होतात. याशिवाय क्रॅम्स येण्याचा त्रासंही कमी होतो.
मासिक पाळीच्या काळात शरीरातील पाण्याची पातळी योग्य असणं अत्यंत आवश्यक असतं. दही खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळीही संतुलित राहण्यास मदत होते.
दही हे प्रोबियोटिक आहे. यामध्ये अनेक गुणधर्म असल्याने आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीला ते मदत करते.
दह्यामध्ये फॅटस, प्रथिनं आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. दह्यातील कॅल्शियम मूड स्विग्ज, नैराश्य आणि चिडचिडेपणा दूर ठेवण्यास मदत करतं.
कॅल्शियममुळे शरीरातील हाडांची मजबुती वाढते.
दह्यात असलेल्या चांगल्या जीवाणूंमुळे सूज, जळजळ कमी होणं, अपचनाच्या तक्रारी दूर होण्यासही मदत होते.