मुंबई : आहारात अंड्यांचा समावेश केल्याने आरोग्य सुधारते. वजन वाढवण्यासाठी अंड्याचा फायदा होतो. मात्र केसांच्या आरोग्यासाठीदेखील अंड फायदेशीर असते हे तुम्हांला ठाऊक आहे का? 
केसांचे गळणे, शुष्कता, फाटे फुटणे, कोंडा अशा अनेक समस्यांवर अंड्याचा हेअरपॅक सर्वोत्तम उपाय आहे. अंड्यातील अत्यावश्यक फॅटी ऍसिडमुळे केसांचे मुळापासून पोषण होते. अंड्यातील अँटिऑक्सिडेंट  घटकांमुळे केस चमकदार होतात तसेच शुष्कता कमी होऊन ते मजबूत होतात. कोलेस्टोरॉलमुळे अंड्यातील महत्त्वपूर्ण घटक केसांमध्ये शोषले जाऊन केसांचा पोत सुधारतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मग केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अंड्याचे हे  काही घरगुती हेअरपॅक जरूर वापरून पहा.


केसांच्या वाढीसाठी 


एका अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये एक टिस्पून ऑलिव्ह ऑइल मिसळा. मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत ढवळा. त्यानंतर हे मिश्रण टाळूला व केसांना लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर सौम्य शाम्पू लावून थंड पाण्याने केस धुवा.


केस मऊसूत होण्यासाठी 


एक कप दह्यात (तुमच्या केसांच्या लांबीनुसार तुम्ही प्रमाण कमी-जास्त करू शकता.)  अंड्यातील पिवळा बलक घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. केसांना लावा आणि 20 मिनिटांनंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुवा म्हणजे अंड्याचा वास निघून जाईल.


केसांना कंडीशनिंग होण्यासाठी 


एका वाटीमध्ये अंड्याचा पिवळा बलक घेऊन त्यात एक टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल मिसळा. मिश्रण एकजीव होईपर्यंत एकत्र करा. मिश्रण थोडे पातळ होण्यासाठी त्यात थोडे कोमट पाणी मिसळा. केस धुतल्यानंतर हे मिश्रण केसांना लावा. काही वेळ तसेच राहू द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.


केसांचा पोत सुधारण्यासाठी –


एका वाटीमध्ये अंड्याचा पिवळा बलक, एक टेबलस्पून मध, एक टेबलस्पून दही आणि अर्धा टीस्पून खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल यांचे एकत्र मिश्रण करा व तुमच्या केसांना लावा. दोन तासांनी केस स्वच्छ धुवा.


खास टीप  


हेअरपॅक्स लावल्यानंतर केस गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने धुवावेत. कारण अंड्यामध्ये प्रोटिन असल्याने उष्णतेशी संपर्क झाल्यास ते आकुंचन पावतात. त्यामुळे तुमच्या केसांमधून हेअरपॅक निघणे अवघड होऊन बसते.