मुंबई : जसजसा उन्हाळा पुढे सरत आहे तसा उन्हाचा कडाकाही वाढत आहे. कडक उन्हामुळे अंगाची अक्षरश: लाही-लाही होण्यास सुरुवात झाली आहे. बाहेर पडल्यावर कडक ऊन आणि घरामध्येही घमाच्या धारा अशी परिस्थिती आहे. उन्हाळ्यातील बऱ्याच आरोग्य समस्यांचे मूळ हे आहारात आणि आपल्या पचन संस्थेत होणाऱ्या बदलांमध्ये दिसून येते. या काळात पित्तामध्ये वाढ होते. वातावरणात उष्णतेत वाढ झाल्यामुळे शरीरातील व आतडय़ातील स्निग्धता नष्ट होते. त्यामुळे जड अन्न पचत नाही व शरीरात पाण्याची गरज वाढते. म्हणूनच या दिवसातील आजारपण टाळण्यासाठी  लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालयाचे पवन लड्डा यांंनी सुचवलेले हे उपाय नक्की लक्षात ठेवा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१) उघड्यावर कापून ठेवलेली फळे खाण्याची टाळावी. उघडय़ावर कापून ठेवलेल्या फळांमधून-त्यावर बसलेल्या माशांमुळे टायफॉईड, कावीळ, गॅस्ट्रो या आजारांची लागण होते. तीच गत फळांच्या रसाची होते. फळांच्या रसामध्ये वापरलेला बर्फ अत्यंत घातक . ग्रामीण भागात उन्हाळ्यामध्ये उसाच्या रसवंतीवर खूप गर्दी होते. पण यातून बऱ्याचदा कावीळ, टायफॉइडची लागण होते. म्हणून अस्वच्छ रसवंतीवरील रस पिण्याचे टाळावे. याच पध्दतीने उघडयावरील अन्न खाणे टाळावे. 


२) उन्हाळ्यात भरपूर पाणी असणारी कलिंगड, खरबूज, द्राक्ष, आंबा ही फळे आवर्जून खावीत. 


३) पाणी भरपूर प्यावे, दिवसभर तहान तहान होत असेल तर जिर्‍याचे पाणी अधेमधे प्यावे.


४) याशिवाय गुढीपाडव्याला गुढीला घालण्यात येणार्‍या गाठींची माळ पाण्यात बुडवून त्याचे पाणी घरातील लहान मुलामुलींना दिवसातून एकदा प्यायला द्यावे. त्यामुळे लहानग्यांच्या शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण कायम राहण्यास मदत होते. 


५) त्याचबरोबर जिरेपूड किंवा काळेमीठ घालून ताक पिणे किंवा लस्सी, मठ्ठा, कैरीचे पन्हे, गुलकंद युक्त दुध, मोरावळा, आवळा शरबत, कोकम शरबत, खस सरबत, उसाचा रस, शहाळ्याचे पाणी पिण्यानेही उन्हाळ्याच्या दिवसात आराम पडतो.


६) गुळाचा खडा तोंडात ठेवला की त्यातून लगेच शरीराला शक्‍ती मिळते म्हणून उन्हातान्हातून आल्यावर गूळ-पाणी देण्याची पद्धत असते. गूळ हा रक्‍तवर्धकही असतो.


७) रात्री झोपताना म्हशीचे दूध प्यावे . म्हशीच्या दुधात स्निग्धता अधिक असते. ज्यांना साखर चालते त्यांनी साखरयुक्त दूध प्यायले तरी चालेल. 


८) उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू. या दिवसांत सूर्याची तीव्र उष्णता शरीरातील स्निग्धता कमी करते. त्यामुळे कडक उन्हाचा त्वचेशी थेट येणारा संपर्क टाळायला हवा. 


९) या दिवसांत खूप घाम येत असल्याने कमी कपडे घालण्याकडे सर्वाचा कल असतो. पण विशेषत: बाहेर पडताना त्वचा कपडय़ांनी झाकणे गरजेचे आहे. सुती, खादीचे किंवा कोणतेही नैसर्गिक कापडाचे कपडे वापरा. 


१०) थंड पाण्याने स्नान करावे, शक्य असल्यास दिवसातून दोन वेळा आंघोळ करावी, शरीराचे तापमान कमी ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. 


११) ग्रीष्म ऋतूत दिवसा झोपावे असेही सांगितले आहे. इतर वेळी दिवसाची झोप अयोग्य समजली जाते. पण या दिवसांत थंड खोलीत दुपारीही थोडा वेळ झोपले तर चालू शकते. 


१२) या ऋतूची आणखी एक वेगळी बाब अशी, की या दिवसांत व्यायाम कमी करावा. अति व्यायामाने नुकसान होण्याची शक्यता अधिक. त्यामुळे हलका व्यायाम या दिवसांत चांगला. 


१३) या ऋतूत मद्यपान, मांसाहार, अत्याधिक तिखट-मसालेदार पदार्थ शक्यतो वर्ज्य असावे.
 
१४) फ्रिज चे पाणी टाळावे. त्याएवजी माठामध्ये मोगरा किंवा चंपासारखी ताजी सुगंधी फुले किंवा वाळा घातलेले पाणी प्यावे. गारेगार आईसक्रिम, कोल्ड्रिक्स ही कृत्रिम थंडावा देणारे पदार्थ टाळावेच. 


१५) मराठवाडा, विदर्भ, खान्देशात दिवसा बाहेर जाताना किंवा बाहेरून आल्यावर हातापायांना कांद्याचा रस चोळणे हा पिढय़ान्पिढय़ा चालत आलेला उपाय आहे. 


१६) घाम येणे, मळमळ, उलटय़ा, घाबरलेपणा होणे आणि जास्त प्रमाणात थकवा, त्वचा निळी पडणे आणि शरीराचे तापमान कमी होते. चक्कर येणे, बी.पी. कमी होणे, नाडीचे ठोके कमी होणे. अशी उष्माघाताची लक्षणे आढ्ळ्यानंतर रुग्णास ताबडतोब हॉस्पीटल दाखल करून औषधोपचार करावा.