गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : एक धक्कदायक बातमी आहे. परभणीतले प्रसिद्ध उद्योगपती आणि बॅडमिंटनपटू असलेल्या तरुणाचा खेळतानाच हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय. या घटनेमुळे पुन्हा एकदा तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं चालल्याचं पुढं आलंय. फिटनेससाठी खेळ आणि व्यायाम करणाऱ्या तरुणांमध्ये हे प्रमाण का वाढत चाललंय. यावरचा हा विशेष रिपोर्ट. (famous businessman and badminton player sachin tapadia of parbhani died of a heart attack)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होय हार्ट अटॅक तुमचा आयुष्याचा खेळ संपवू शकतो. तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय. अशीच एक धक्कादायक घटना परभणीत घडलीय. 


परभणीतले 44 वर्षीय प्रसिद्ध उद्योजक आणि बॅटमिंटनपटू सचिन तापडिया यांचा बॅडमिंटनच्या मैदानावरच हार्ट अटॅकनं अंत झालाय. विशेष म्हणजे त्यांच्या धक्कादायक मृत्यूचा संपूर्ण घटनाक्रमच सीसीटीव्हीत कैद झालाय. 


सचिन तापडिया हे नेहमीप्रमाणे सकाळी बॅडमिंटन खेळायला आले. त्यांनी पहिला राऊंडही पूर्ण केला. त्यानंतर पाणी पिण्यासाठी मैदानातनं बाजूला आले. आणि पाणी पिता पिताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. 


त्यांना तिथून तसंच उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. अचानक खेळताना हार्ट अटॅकनं मृत्यू होण्याची ही काही पहिली घटना नाही. बॉलिवूडमधले तरुण आणि फिट असलेल्या अभिनेत्यांचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय.


यात ४० वर्षांचा टीव्ही अॅक्टर सिद्धार्थ शुक्ला, ४६ वर्षांचा दक्षिण भारतीय अभिनेता पुनीत राजकुमार, ५३ वर्षांचा प्रसिद्ध गायक के.के. यांचा समावेश आहे. 


हार्ट अटॅकला तशी अनेक कारणं असतात. मात्र याची लक्षणं दिसताच त्याबाबत योग्य खबरदारी घ्यायला हवी.  हार्ट अटॅकच्या आधी नेहमी छातीत दुखू लागतं आणि चक्कर येते. श्वास घेण्यास त्रास होतो आणि धाप लागते.  अस्वस्थ होणं आणि पॅनिक अटॅक आल्यासारखं वाटणं.  उलटीसारखं होणं आणि खोकलाही येऊ शकतो. ही सर्व लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक चाचण्या करायला हव्या. 


आरोग्य उत्तम राहावं यासाठी तरुण वेगवेगळे मैदानी खेळ आणि व्यायाम करतात. मात्र ते करताना योग्य ती काळजी घेत नाहीत. अति खेळ आणि अति व्यायामही शरीराला घातक ठरू शकतो. 


त्यामुळे योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंच खेळा आणि व्यायाम करा. नाहीतर हार्ट अटॅक तुमच्याही आयुष्याचा 'खेळ' संपवेल.