अंजीराचे अनेक आहेत फायदे; मात्र खाण्याची योग्य पद्धत माहितीये का?
सकाळी रिकाम्या पोटी अंजीर खाणं योग्य मानलं जातं.
मुंबई : सध्याच्या चुकीच्या जीवनशैलीमध्ये अनेकांना फीट आणि फाईन रहायचं असतं. मात्र सर्वांनाच ते शक्य होत नाही. यासाठी आहारात बदल करण्याचा सल्ला दिला जातो. यावेळी तुम्ही आहारात अंजीरचा समावेश करू शकता. अंजीरच्या सेवनाने वजन कमी करण्यास मदत होते. याशिवाय पचन सुधारण्यासाठी, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी अनेक हे फायदेशीर आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, सकाळी रिकाम्या पोटी अंजीर खाणं योग्य मानलं जातं. त्यामुळे तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये अंजीर समाविष्ट करणं चांगलं मानलं जातं. सकाळच्या नाश्त्याच्या वेळी 2-3 अंजीर खाऊ शकता. मात्र अंजीर खाण्याची योग्य पद्धत माहितीये का?
अंजीर कापून खावं
तुम्ही अंजीर हे इतर फळांप्रमाणेच कापून खावं. हे खाताना एक खात्री करून घ्यावी की ते ताजं असावं. तुम्ही सकाळच्या वेळेस 2-3 अंजीर खाऊ शकता. अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, ज्यामुळे तुमचं पोट दिर्घकाळ भरलेलं राहतं.
सुकवलेल्या अंजीरामध्ये साखर आणि कॅलरीज जास्त असतात, त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सुके अंजीर खाणं शक्यतो टाळावं. सुके अंजीर रात्रभर भिजवून खाल्ल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात.
दुधासोबत मिक्स करा अंजीर
जर तुम्हाला अधिक फायदे हवे असतील तर दुधासोबत अंजीर मिक्स करा आणि ते दूध प्या. तुमची झोप सुधारण्यास मदत होईल.