धावपळीच्या आयुष्यात 5 मिनिटांच्या योगाने ताण करा दूर
आजच्या या धावपळीच्या आयुष्यात बऱ्याच लोकांना शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. सकाळच्या वेळेतील `या` योगा रुटीनमुळे अशा शारीरिक आणि मानसिक समस्यांना दूर करु शकता.
आजच्या धावपळीच्या जीवनात बरेचजण फक्त आरोग्यच नाही तर मानसिक समस्येने सुद्धा ग्रासलेले असतात. दैनंदिन कामामुळे आणि आपल्या वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे अनेकांना शारीरिकच नव्हे तर मानसिक थकवा जाणवतो. यामुळे लोक मानसिक तणावाचे शिकार होतात. ताणतणाव आणि थकव्यापासून आराम मिळवण्यासाठी मानसिक शांतता मिळणे हा त्यावरचा उत्तम उपाय ठरतो. म्हणूनच या धावपळीच्या जीवनात मानसिक शांतता मिळवण्यासाठी नेमके काय करावे? तर, रोज दिवसातून फक्त 5 मिनिटे योगा केल्याने मानसिक शांतता तर मिळतेच पण त्यासोबतच शरीर सुद्धा सुदृढ राहण्यास मदत होते.
सकाळच्या वेळी योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक ताणतणाव दूर करण्याच्या दृष्टीने फारच फायद्याचे ठरते. सकाळी योगा केल्याने दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. ह्या 5 मिनिटांच्या योगा रुटीनचा तुमच्या दिनचर्येत नक्की समावेश करा जेणेकरुन दिवसभराचा थकवा दूर होण्यास मदत होईल.
अनुलोम-विलोम (1 मिनिट)
योगाची सुरूवात अनुलोम-विलोमने करा. हा योगाचा प्रकार करण्यासाठी सुरुवातीला विश्रांतीच्या अवस्थेत बसा. यानंतर आपली एक नाकपुडी वर हात ठेऊन ती दुसऱ्या नाकपुडीतून श्वास घ्या आणि बंद केलेल्या नाकपुडीवरचा हात काढून तिथून श्वास सोडा. असे वारंवार 1 मिनिट करत राहा. असे केल्याने तणाव कमी आणि डोके शांत होण्यास मदत होते.
भुजंगासन (1 मिनिट)
हा प्रकार करण्यासाठी आपले हात शरीराच्या जवळ, आपल्या खांद्याच्या बाजूला ठेवा. हात छातीजवळ असावेत. हळू हळू श्वास घ्यायला सुरू करा आणि आपल्या छाती आणि डोक्यासह, शरीराचा वरचा भाग शक्य तितका वाढवा. या आसनात शरीराची रचना फणा काढलेल्या नागाप्रमाणे दिसते म्हणून या आसनाला भुजंगासन असे म्हणतात.
हे ही वाचा: अंथरुणावर बसून अन्न का खाऊ नये? नुकसान ऐकल्यानंतर तुम्ही ही सवय आजच सोडून द्याल
मार्जारासन -कॅट पोझ (1 मिनिट)
मार्जारासन करताना शरीराचा भाग पुढच्या बाजूला वाकवून दोन्ही हात पुढे नेऊन उभे राहा. आसनादरम्यान शरीराचा भाग वरच्या आणि खालच्या बाजूला ढकला. यामुळे पाठीच्या कण्यावर ताण येतो. या ताणामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. तसेच मज्जासंस्थेलाही फायदा होतो. मार्जारासनातल्या मुद्रेमध्ये असलेल्या व्यक्तीला मांजरांप्रमाणे शरीराची हालचाल करावी लागते. म्हणून या आसनाला कॅट पोझ (Cat Pose) असे म्हटले जाते.
बालासन (1 मिनिट)
बालासन करण्यासाठी योगा मॅटवर गुडघ्याच्या सहाय्यावर बसा. दोन्ही पायाची तळवे आणि टाचांना एकत्रित आणा. आपले हात समोर आणून दोन्ही खांदे जमिनीला स्पर्श करतील यासाठी प्रयत्न करा. यामुळे छाती, कंबर आणि खांद्याचे दुखणे दूर होण्यास मदत होते. बालासन पोटाच्या अंतर्गत अवयवांनादेखील आराम देते. मनाला एक शांती तजेलदार, टवटवीतपणा देणारे हे आसन आहे.
शवासन (1 मिनिट)
शवासन ही विश्रांती देणारी अवस्था असून सर्व योगासने झाल्यानंतर केली जाते. सपाट भागावर पाठीवर झोपा. पाय व गुडघ्यांना पूर्ण आराम मिळू द्या. पायाची बोटे बाहेरील बाजूला ठेवा. हे करत असताना श्वास सावकाश, हळू व दिर्घ घ्या. याने तुमचे संपूर्ण शरीर विश्रांती अवस्थेत नेण्यास होते. शरीराला स्थिर करण्याचा व वातदोष कमी करण्याचा हा एक उत्तम उपाय आहे.
या 5 मिनिटांच्या योगा रुटीनचे महत्त्व
सकाळचे हे 5 मिनिटांचे योगा रुटीन शरीराला विश्रांती देते. तसेच योगा केल्याने मनात सकारात्मक विचारांचा संचार होतो. ताणतणाव आणि चिंता दूर होऊन मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होते. तसेच दिवसभर काम करण्यासाठी शरीर उत्साहवर्धक राहते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)