Immunity : प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात `हा` पदार्थ टाळा
एका अभ्यासाच्या माध्यमातून मीठाचं अतिसेवन इम्युनिटीसाठी धोकादायक ठरू शकतं असं समोर आलं आहे.
मुंबई : जेवणात मीठाचं प्रमाण कमी असलं तरीही चवं बिघडते. मीठ फक्त जेवणाचा स्वादचं वाढवत नाही तर आरोग्यासाठी देखील काही प्रमाणात फायदेशीर मानलं जातं. मीठाच्या माध्यमातून आवश्यक असलेले सोडियम आणि क्लोराइड मिनरल मिळतं. तसंच अधिक मीठाचं सेवन ब्लड प्रेशर सारख्या समस्यांना निमंत्रण देतं. तर एका अभ्यासाच्या माध्यमातून मीठाचं अतिसेवन इम्युनिटीसाठी धोकादायक ठरू शकतं असं समोर आलं आहे.
सायन्स ट्रान्सलेशन मेडिसीनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, जर्मनीतील यूनिवर्सिटी हॉस्पिटल ऑफ बोनच्या संशोधकांनी एक अभ्यास केला. या अभ्यासातून असं लक्षात आलं की, आपल्या आहारात अधिक मीठाचा समावेश केल्याने इम्यून सिस्टीममधील सेल्सचं अॅन्टी बॅक्टेरियल फंक्शन बिघडू शकतं. ज्यामुळे इम्यून सिस्टीम धोकादायक बॅक्टेरियाला नष्ट नाही करू शकत.
संशोधकांच्या टीमने हा अभ्यास उंदरांवर केला. ज्यासाठी उंदरांना लिस्टीरिया बॅक्टेरियाने संक्रमित केलं. यानंतर ज्या उंदरांना अधिक मीठ असलेला आहार देण्यात आला होता त्यांची परिस्थिती गंभीर झाली होती. जास्त मीठाचं सेवन केल्याने न्यूट्रोफिल नावाच्या रोगप्रतिकारक पेशी कमकुवत होऊ शकतात. जे बॅक्टेरीयल किडनी इन्फेक्शनपासून लढण्यास मदत करतात.
मीठाचं प्रमाण किती असलं पाहिजे?
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक प्रौढ व्यक्तीने एका चमच्यापेक्षा कमी म्हणजे दररोज 5 ग्रॅम मीठाचं सेवन करावं. ही एक मात्रा आहे. तर लहान मुलांच्या आहारामध्ये मीठाचं प्रमाण कमी असलं पाहिजे. या व्यतिरिक्त, दररोज आवश्यक असलेल्या मीठाचं प्रमाण आपल्या शारीरिक हालचालींच्या पातळीवर देखील अवलंबून असतं. हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.