मुंबई : लवकरच घराघरात गणेशोत्सवाची धूम सुरू होईल.आबालवृद्धांना भुरळ घालणारे या सणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे 'प्रसाद' ! फळांचे काप, लाडू, साखर फुटाणे असे विविध प्रकार तुम्ही अनेकदा प्रसादामध्ये खाल्ले असतील. पण सारीकडे हाच प्रसाद खाऊन कंटाळा आलाय? मग यंदा त्याला थोडा हेल्दी ट्विस्ट द्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सणासुदीला प्रमाणापेक्षा अधिक आणि गोडाधोडाचे खाणे झाल्यास वजन वाढण्याची शक्यता असते, मधूमेहींमध्ये रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच प्रसादाला यंदा या हेल्दी पंचखाद्यांचा प्रसाद म्हणून नक्की विचार करा. 


जरूर वाचा :  तुमचं आरोग्य जपायला गणपती बाप्पाही देतो ही ९ हेल्थ सिक्रेट्स !


खोबरं –  गणपतीच्या मोदकापासून ते प्रसादापर्यंत सारीकडे ‘खोबर्‍याचा’  वापर केला जातो. खोबर्‍यामुळे शरीरात स्निग्धता वाढते.
खसखस – सणासुदीच्या काळात खाण्याच्या बाबतीत ना वेळ पाळली जात ना पदार्थांची निवड. परंतू त्यामुळे पचनाचे विकार वाढण्याची शक्यता असते. खसखस पाचक असल्याने पचन सुधारण्यास मदत करते. 
खारीक – वर्षाऋतूत कमजोर झालेल्या पचनशक्तीला उभारी देण्यासाठी तसेच भूक वाढवण्यासाठी खारीक फायदेशीर ठरते.
खजूर – चवीला गोड असणारे खजूर शरीरात उर्जा आणि बळ वाढवण्यास मदत करते.
खडीसाखर – घरात गणपतीचे आगमन झाल्यानंतर प्रत्येकवेळी वेळेवर जेवण होईल असे नाही. अशावेळी पित्त वाढण्याची शक्यता असते. खडीसाखर पित्त कमी करण्यास मदत करते. 


 मग यंदा प्रसादाला खोबरं, खारीक, खजूराचे तुकडे, खडीसाखर आणि खसखस याचे तयार मिश्रण डब्ब्यात भरून ठेवा. आबालवृद्धांसाठी पोषक असा हा प्रसाद चविष्ट आणि हेल्दी आहे. नक्की जाणून घ्या जी.एस.बी गणेश मंडळाच्या पंचखाद्याच्या प्रसादाचं वैशिष्ट्य !