लस घ्या अन्यथा 5 हजारांचा टॅक्स भरा!
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र अजूनही काही लोकं लस घेत नाहीयेत.
क्यूबेक : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र अजूनही काही लोकं लस घेत नाहीयेत. अशाच लोकांसाठी कॅनडा देशाने एक कठोर निर्णय घेण्याचं ठरवलंय. ज्यांनी ही लस घेतली नाही त्यांच्याकडून 80 कॅनेडियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 5 हजार रुपये इतके कर आकारला जातोय.
नवा आरोग्य कर लागू करण्याची तयारी
WION च्या अहवालानुसार, कॅनडाचा क्यूबेक प्रांत COVID-19 साठी लसीकरण न झालेल्या व्यक्तींसाठी नवीन आरोग्य कर लागू करण्याची तयारी करतंय.
क्यूबेक प्रीमियरचे फ्रांकोइस लेगॉल्ट म्हणाले, "आम्ही लसीकरणाला नकार देणार्या सर्वांसाठी हेल्थ टॅक्सवर काम करतोय. कारण हे सर्वजणं आर्थिक भार ठरतायत."
क्यूबेकमधील 10 टक्के लोक आहेत ज्यांना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. या लोकांना लसीकरण झालेल्या 90 टक्के लोकांना नुकसान पोहोचवण्याचा कोणताही अधिकार नाहीये, असं लेगॉल्ट यांनी सांगितलंय.
क्यूबेकने 30 डिसेंबर रोजी कोरोना व्हायरसच्या नव्या लाटेविरूद्धच्या लढाईत काही निर्बंध मागे घेण्याची घोषणा केली होती. यामध्ये रात्री 10 वाजता कर्फ्यू तसंच खाजगी मेळाव्यावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. क्युबेक हे जगातील पहिलं असं ठिकाण आहे जिथे लस न घेणाऱ्यांवर कर आकारला जातो.