कॅन्सरवर सापडलं `रामबाण औषध` ? एका गोळीचे 6 डोस, कॅन्सरचा खात्मा ?
डॉक्टरांच्या चाचणीत 100 % रुग्ण ठणठणीत, कॅन्सरच्या 18 रुग्णांवर 6 महिने चाचणी
Cancer Medicine : कॅन्सरचं (cancer) नाव काढलं तरी अंगाला शहारे येतात. त्यावरील उपचार म्हणजे वेदना आणि यातना. त्यात किमोथेरपीचे (chemotherapy) साईड इफेक्ट्स, सर्जरीनंतरही सातत्यानं घ्यावी लागणारी औषधं. मात्र आता ही कटकट संपण्याची शक्यता आहे. कारण कॅन्सरवर रामबाण इलाज सापडल्याचा दावा संशोधकांनी केलाय. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये (New England Journal of Medicine) डॉ ल्यूस ए डियाज यांनी याबाबत शोधनिबंध लिहिलाय.
कॅन्सरवर रामबाण औषध?
डोस्टारलिमॅब (dostarlimab) असं या जादुई औषधाचं नाव आहे. कॅन्सरच्या 18 रुग्णांवर 6 महिने ही चाचणी करण्यात आली. त्यांना दर तीन आठवड्यांनी 1 असे 6 डोस देण्यात आले. आश्चर्य म्हणजे सर्वच्या सर्व रुग्ण कॅन्सरमुक्त झाल्याचं चाचण्यांमधून स्पष्ट झालं. या एका गोळीची किंमत 11 हजार डॉलर म्हणजे अंदाजे 8 लाख 54 हजार 859 रुपये आहे. संपूर्ण उपचारांचा खर्च सुमारे 52 लाखांच्या घरात आहे.
सध्या केवळ 18 रुग्णांवरच चाचणी झाली असली तरी असं 100 टक्के यश प्रथमच मिळालंय. किमान 100 रुग्णांवर चाचणी केली जावी, अशी सूचना कॅन्सरतज्ज्ञांनी केली असून त्यानंतरच औषधाची खरी उपयुक्तता स्पष्ट होऊ शकेल.
पण या संशोधनामुळे लाखो कॅन्सरग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत हे नक्की.