कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी
कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा म्हणजे बूस्टर डोस द्यावा का हा प्रश्न उपस्थित होतोय.
मुंबई : देशातून अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत देशातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा म्हणजे बूस्टर डोस द्यावा का हा प्रश्न उपस्थित होतोय. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लसीच्या बूस्टर डोसची आवश्यकता नसल्याचं म्हटलंय.
WHOने बुधवारी म्हटलं की, सर्वप्रथम आपल्याला जगातील गरीब देशांना पूर्णपणे लसवंत करण्याबाबत विचार करणं फार गरजेचं आहे. त्यानंतरच श्रीमंत देशांच्या लसीच्या बूस्टर डोसबाबत विचार केला पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून डेल्टाच्या रूग्णांची संख्या अमेरिकेत वाढताना दिसतेय. यामुळे अमेरिकेने 20 सप्टेंबरपासून बूस्टर डोस देणार असल्याचं सांगितलं.
WHO च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांच्या म्हणण्याप्रमाणे, "कोरोनाच्या सध्याच्या आकडेवारीवरुन ही गोष्ट निश्चितच असं सांगता येऊ शकतं की सध्या बूस्टर डोसची गरज नाहीये. दरम्यान यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे."
डब्ल्यूएचओचे वरिष्ठ सल्लागार ब्रुस एल्वार्ड म्हणाले की, "सध्या जगभरात पुरेशा लस उपलब्ध आहेत. मात्र परंतु ती योग्य क्रमाने तसंच योग्य ठिकाणी उपलब्ध नाही. संपूर्ण जगभरात कोरोनाचा धोका आहे आणि सर्वप्रथम लसीचे दोन डोस लोकांना उपलब्ध करून दिले पाहिजेत. त्यानंतर आपण बूस्टर डोस देण्याबाबत विचार केला पाहिजे."