Omicron समोर देशाने टेकले हात; सरकार हतबल
देशात संसर्गाची नवीन प्रकरणं पुन्हा समोर येताना दिसतायत.
लंडन : ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्यासमोर, यूकेचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी एक प्रकारचा पराभव स्वीकारला आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून असंच लक्षात येतंय. आरोग्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की, कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन व्हेरिएंटबद्दल आपल्याला अद्याप फारशी माहिती नाहीये. त्यावर प्रतिक्रिया देण्यास कदाचित उशीर झाला आहे. ब्रिटनमध्ये संसर्गाची नवीन प्रकरणं पुन्हा समोर येताना दिसतायत.
सध्या अशी आहे रणनिती
WION मध्ये छापलेल्या माहितीनुसार, 'संडे टेलीग्राफ'मध्ये लिहिलेल्या एका कॉलममध्ये, यूकेचे आरोग्य मंत्री साजिद जाविद म्हणाले, "ओमायक्रॉनसमोर असलेल्या आव्हानांकडे आपल्याला बारकाईने पाहावं लागेल. हे लक्षात आल्यापासून, आमची रणनीती शास्त्रज्ञांना शक्य तितका वेळ मिळावा, जेणेकरून ते धोक्याचे मूल्यांकन करू शकतील आणि ते टाळण्यासाठी उपाय सुचवू शकतील."
चुकांमधून शिकलं पाहिजे
आरोग्य मंत्री पुढे म्हणाले, "कोरोनाला सामोरं जाण्यासाठी संसदेत प्लॅन बी वर चर्चा करणं मला अजिबात आवडले नाही. कारण वैयक्तिक स्वातंत्र्य आणि संधींना प्रोत्साहन देणं हे माझ्या राजकारणात येण्याचं एक कारण आहे.
यापूर्वी एका टीव्ही शोमध्ये साजिद जाविद म्हणाले होते की, "सरकारने भूतकाळातील चुकांमधून शिकलं पाहिजे, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली आणि संसर्गाची प्रकरणे वाढली. आम्ही लवकरच कठोर पावले उचलली नाहीत, तर संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ होईल."
Omicron ने 7 जणांचा मृत्यू
ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसर्गाची एकूण 90,418 नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. तर या प्राणघातक विषाणूमुळे 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात ओमायक्रॉन या विषाणूच्या नवीन व्हेरिएंटची लागण झालेल्या 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यूकेचे आरोग्य मंत्री साजिद जाविद म्हणाले, "सरकारने साथीच्या रोगाचा कसा सामना केला हे आम्ही यापूर्वी पाहिलंय. वाढत्या प्रकरणांमुळे कडक लॉकडाऊन नियम लागू करण्याच्या सरकारच्या योजनेवरील अहवालांचा हवाला देऊन जे आवश्यक असेल ते आम्ही करू."