मुंबई : गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाचा सामना करतोय. कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊनही लावण्यात आला. हा लॉकडाऊन आणि कोरोना यांचा परिणाम अनेकांवर झाला. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनचा गंभीर परिणाम हा आपल्यासोबत लहान मुलांवरही झालेला दिसून आला आहे. ‘शुश्रुषा’ सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीने एक सर्व्हेक्षण करण्यात आलं. यामधून हे स्पष्ट झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘शुश्रुषा’ सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्थेच्या मानसतज्ज्ञांनी सांगली जिल्ह्यातील पंधरा वर्षांपर्यतच्या एकूण 8892 मुला-मुलींचा मानसशास्त्रीय अभ्यास आणि सर्वेक्षण केलं. यामध्ये तीव्र स्वरूपाच्या मानसिक, भावनिक, वर्तणूक, शैक्षणिक समस्या असणाऱ्या मुलांमधील विविध मानसिक व मनोसामाजिक लक्षणांचा शोध या सर्वेक्षणात घेतला गेला.


या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून कोरोना काळात अशा प्रकारच्या मानसिक तक्रारी घेऊन येणा-या मुलांची संख्या तिप्पट झाल्याचं दिसून आले. या समस्यांमध्ये चिडचिडेपणा, राग तसंच भूकेच्या तक्रारी असल्याची नोंद करण्यात आली आहे.


यात ८५ टक्के मुलांमध्ये चिडचिडेपणा, ५७ टक्के राग आणि अति संताप, ५२ टक्के मुलांमध्ये भुकेच्या तक्रारी तर ५१ टक्के मुलांमध्ये सर्वाधिक अतिचंचलतेचं प्रमाण असल्याचे दिसून आलं आहे. या सर्वेक्षणामध्ये चिकित्सालयीन, शालेय, बाल मानसशास्त्रतज्ञ अशा तज्ज्ञ आणि प्रशिक्षित 25 मानस तज्ज्ञांनी सहभाग घेतला होचा.


या तज्ज्ञांनी सुमारे 9 हजार कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन पालक आणि मुलांशी संवाद साधला. यावेळी मुलांमध्ये विनाकारण भीती, वारंवार रडणं, कमी झोप, मुलामध्ये न मिसळणं, अंथरूण ओलं करणं, अंगठा चोखणं, नखं खाणं, बोलताना अडखळणं, हात पाय थरथरणं, डोके आणि पोटदुखी अशा अनेक भावनिक, शारीरिक तक्रारी दिसून आल्या.


इतकंच नाही तर चिडचिडेपणा, अतिचंचलता, संताप, एकाग्रतेचा अभाव आणि लक्षात न राहण्याच्या सर्वाधिक जास्त समस्या दिसून आल्या आहेत. मुलांमधील या भावनिक, वर्तणूक आणि मनोसामाजिक समस्यांचं योग्य वेळी निराकरण न झाल्यास त्यांच्या मानसिकतेबरोबरच शिक्षण, आरोग्य व समाज वर्तनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता मानसतज्ज्ञांनी व्यक्त केलीये