अनेक आजारांवर परिणामकारक ठरेल तुमचे हास्य!
आयुष्यात चढ-उतार येतच राहतात.
नवी दिल्ली : आयुष्यात चढ-उतार येतच राहतात. सुख-दुःख तर आयुष्याचा भागच असतो. पण त्यातही आपण जर हसत राहिलो तर समस्या काहीशा हलक्या होतात. हास्य फक्त तुमच्या व्यक्तिमत्वाला खुलवत नाही तर प्रेरणा आणि सामर्थ्य देते. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन, असे म्हटले जाते. ते अगदी खरं आहे. कारण हसल्याने फक्त चेहरा सुंदर दिसत नाही तर आरोग्यही चांगले राहते. जाणून घेऊया हास्याचे काही फायदे...
रक्तप्रवाह सुरळीत होतो
डॉक्टर आणि संशोधकांनुसार, मोकळेपणाने हसल्याने रक्तप्रवाह अधिक चांगल्या प्रकारे होतो. खुलेपणाने हसल्याने तुमची मान, चेहरा आणि त्वचा याला चांगला स्ट्रेच मिळतो. त्यामुळे शरीरात रक्तसंचार उत्तम पद्धतीने होण्यास मदत होते.
ताण-तणाव जाईल दूर पळून
ताण-तणाव, चिंता, काळजी दूर करण्याची शक्ती हास्यात आहे. आपल्या मेंदूवर, शरीरावर पडणारा तणाव दूर करण्यासाठी हास्य फायदेशीर ठरतं. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, जास्त हसणारी व्यक्ती कमी हसणाऱ्या व्यक्तीच्यी तुलनेत अधिक सामाजिक असते.
मेंदूत सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो
आपले जवळचे मित्र, कुटुंबिय यांच्यासोबत केलेल्या मज्जा-मस्तीमुळे मनावरील ताणाचे ओझे हलके होवून शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते. ही सकारात्मक ऊर्जा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. खुलेपणाने हसल्याने शरीर व मन हलके, रिलॅक्स होते, ज्यामुळे शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढते.