मुंबई : कोरोनामुळे अजून शाळा सुरु करण्यात आलेल्या नाहीत. राज्यात शाळा नेमका कधी सुरू होणार? हा प्रश्न अनेकांच्या मनात असताना राज्यातील शाळा सुरू करण्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सूतोवाच केलं आहे. 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षकदिनाच्या पर्यंत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांचं लसीकरण पूर्ण करणार असल्याची मोहीम हाती घेतली असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यातील शाळांमधील शिक्षकांचं लसीकरण करणं ही शाळा उघडण्याची पहिली पायरी आहे. यासाठी टास्क फोर्स तसंच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. 


दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागांमध्ये शाळा सुरू करता येणार का याबाबत कृतिदल विचार करत आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.



राज्यात शाळा नेमका कधी सुरू होणार? याबाबत चाइल्ड टास्क फोर्स सदस्य समीर दलवाई यांनी यापूर्वी माहिती दिली आहे. ते म्हणाले, शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण संपूर्ण व्हायला हवं. तसंच शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळून शाळा सुरु करण्यात याव्यात. यामध्ये एक गोष्ट म्हणजे सर्वांनी लस घेणं गरजेचं आहे.


"राज्यातील शाळांमध्ये जर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पूर्ण तयारी झाली असेल तर शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक आहे. ऑक्टोबर महिन्यापासून लहान मुलांचं लसीकरण सुरू होत असेल तर लसीकरण सुरू होण्याचा आणि शाळा सुरू करण्याचा कोणताही संबंध नाहीये.", असंही डॉ. दलवाई म्हणाले होते.