Health news:तज्ज्ञांच्या मते `असा` असावा मधुमेही रूग्णांचा आहार
मधुमेही रूग्णाला त्याच्या आहाराकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं.
मुंबई : चुकीचा आहार आणि अयोग्य जीवनशैलीमुळे मधुमेह आजच्या काळात एक गंभीर समस्या बनली आहे. मधुमेह हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये रूग्णाला त्याच्या आहाराकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. डायबेटीज म्हणजेच मधुमेह बरा होत नाही मात्र त्याला नियंत्रणात ठेवलं जाऊ शकतं. यासाठी शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावी लागते. आणि हे केवळ चांगल्या आहारामुळेच होऊ शकतं.
आहार तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते मधुमेह अनुवांशिक, वाढत्या वयाप्रमाणे, लठ्ठपणामुळे तसंच तणावामुळे होऊ शकतो. अशा रूग्णांना हृदयविकाराचा झटका आणि हृदयच्या इतर आजारांचा धोका अधिक असतो. शिवाय किडनी आणि पायांमध्ये सुन्नपणाची समस्या देखील जाणवू शकते. हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी रुग्णांना त्यांच्या जेवणावर लक्ष केंद्रित करावं लागेल. यावेळी आहारात फळं, हिरव्या भाज्या तसंच धान्यांचा समावेश करावा.
दह्याचं सेवन
आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या जेवणामध्ये दह्याचा समावेश आवश्यक आहे. हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दहीमध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि पौष्टिक पदार्थांचं प्रमाण चांगलं असतं. तसंच रोग प्रतिकारशक्ती मजबूत होण्यासही मदत होते.
हिरव्या भाज्यांचं सेवन
मधुमेहाच्या रुग्णांना दुपारच्या जेवणामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश केला पाहिजे. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. पालक, मेथी, ब्रोकोली, दुधी, कारलं या भाज्या खाऊ शकता. या सर्वांमध्ये कमी कॅलरी आणि अधिक पोषक घटक असतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
संपूर्ण धान्य आणि डाळींचे सेवन
मधुमेहाच्या रुग्णांनी संपूर्ण धान्य आणि डाळी यांचा आहारात समावेश फायदेशीर आहे. यामध्ये पौष्टिक पदार्थांचं प्रमाण जास्त असण्याबरोबरच, त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, पोटॅशियम आणि फायबर असतात. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.