मुंबई  :  हिमोफिलीया (Hemophilia) हा गंभीर अनुवंशिक आजार असून या आजारामध्ये रक्त गोठवण्यासाठी फॅक्टर्स आवश्यक असतात. आतापर्यंत नऊ जिल्ह्यांमध्ये ही सेवा उपलब्ध होती. आता नव्याने 27 हिमोफिलिया डे-केअर सेंटर्स सुरु करण्यात आले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांत ही सेवा मोफत उपलब्ध झाली असून रुग्णांना दर्जेदार आणि गतिमान आरोग्य सेवा मिळणार आहे, राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या हस्ते  27 जिल्ह्यांतील हिमोफिलीया डे-केअर सेंटर्सचे (Hemophilia Day Care Centers) उद्घाटन करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी डॉ. सावंत यांनी हिमोफिलिया रुग्णांशी संवाद साधून त्यांचं मनोगत ऐकून घेतलं. ही सेवा जिल्हा स्तरावर घराजवळ  उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णांनी आरोग्य मंत्र्यांचे आभार मानले.  हिमोफिलिया डे केअर सेंटर या उपक्रमाबाबत जिल्हास्तरावर जनजागृती करण्याच्या सूचना देत आरोग्य मंत्री डॉ. सावंत  यांनी सेंटरच्या बाहेर संपूर्ण तपशीलवार माहिती असणारा फलक लावण्यात यावा अशी सूचना केली.  याबाबत समाज माध्यमं तसंच प्रसारमाध्यमांमधून जनजागृती करावी. सेंटरमधील औषध साठ्याची  उपलब्धतेनुसार ताबडतोब मागणी नोंदवावी.  या ठिकाणी औषधांचा तुटवडा कुठल्याही परिस्थितीत निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी अशा सूचनाही केल्या.


राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 2013 पासून हिमोफिलीया रुग्णांसाठी एकूण 9 हिमोफिलीया डे- केअर सेंटर्स सुरू आहेत. मात्र आता आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने राज्यातील सर्व जिल्ह्यांत ही सेवा सुरु करण्यात आली आहे. हिमोफिलीया आजाराच्या रुग्णांमध्ये रक्तातील रक्त गोठविणाऱ्या फॅक्टर्सच्या कमतरतेमुळे स्नायू, सांध्यांमध्ये, दातामधून, नाकपुड्यातून तसेच मेंदूत रक्तस्त्राव होतो. फॅक्टरच्या कमतरतेच्या तीव्रतेमुळे वारंवार रक्तस्त्राव होऊ शकतो. ही फॅक्टर्स इतर औषधांच्या तुलनेने महागडी आहेत. रक्तस्त्राव होत असलेल्या परिस्थितीत रुग्णांना उपचारासाठी प्रवास करावा लागतो, ही बाब लक्षात घेऊन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी या आजाराने ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेले फॅक्टर्स सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेतला. 


हिमोफिलीया हा गंभीर अनुवंशिक आजार असून या आजारामध्ये रक्त गोठवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व फॅक्टर्सच्या कमतरतेमुळे रक्तस्त्राव होतो. हा आजार वाय गुणसूत्राच्या दोषामुळे होत असल्याने प्रामुख्याने पुरुष हे या आजाराने ग्रस्त आढळतात. मात्र स्त्रिया या आजाराच्या वाहक आढळतात. राज्यात अशा आजाराचे अंदाजे 4,500 रुग्ण आहेत. 


रायगड, पालघर, धुळे, बीड, पुणे, सोलापूर, नंदुरबार, कोल्हापूर, जळगांव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जालना, परभणी, सांगली, हिंगोली, बुलढाणा, नांदेड, लातुर, धाराशीव, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत नवीन हिमोफिलिया डे-केअर सेंटर्स कार्यान्वित झाल्यामुळे रुग्णांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातच मोफत आणि वेळेत उपचार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आता सर्व जिल्ह्यांतील रुग्णांना याचा लाभ होणार असून सहज उपचार मिळणार आहे.


हिमोफिलिया डे-केअर सेंटर मध्ये दिल्या जाणाऱ्या मोफत सेवा  
- हिमोफिलिया रुग्णांसाठी रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी कलॉटिंग फॅक्टर्स उपलब्ध करून देणार
- सांध्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि सांधे गतिशील राखण्यासाठी फिजिओथेरपी सेवा
- हिमोफिलीया रुग्णांसाठी जीवनशैलीत बदल करण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
- सांधे, मस्क्युलोस्केलेटल, दंत प्रणाली आणि उपचारांची नियमित कालबध्द तपासणी
- हिमोफिलिया रोगाविषयी आरोग्य शिक्षण, जागरूकता व समुपदेशन