Parrot Fever Outbreak: युरोपात पॅरोट फिव्हरमुळे झालेल्या मृत्यूने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. आतापर्यंत या आजारामुळे 5 जणांचा मृत्यू झालाय. या आजाराच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पॅरोट फिव्हरला सिटाकोसिस असंही म्हणतात. युरोपीन देशातील लोकं या आजाराने प्रभावित झाली आहेत. 2023 पासून या आजाराने युरोपात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत पाच जणांचा या आजाराने मृत्यू झाल्याची माहिती WHO ने दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अहवालानुसार गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये पॅरोट फिव्हरचे (Parrot Fever) जर्मनीत 14 आणि ऑस्ट्रियात 14 रुग्ण आढळून आले होते. या वर्षी ऑस्ट्रियात 4 प्रकरणांची नोंद झाली आहे. डेनमार्कमध्ये या वर्षी फेब्रुवारीपर्यंत 23 प्रकरणं आतापर्यंत समोर आली आहेत. नेदरलँडमध्येही 21 रुग्ण आढळून आले आहेत. 


पॅरोट फिव्हर म्हणजे काय?
पॅरोट फिव्हर हा एक संगर्गजण्य आजार आहे जो क्लॅमिडीया जीवाणूंच्या संसर्गामुळे पसरतो. हा जीवाणू पोपटांसह अनेक पक्ष्यांना संक्रमित करतो आणि पक्ष्यांच्या माध्यमातून मनु्ष्याला संक्रमित करतो. विशेष म्हणजे या आजाराचा परिणाम बाधित पक्ष्यांवर दिसून येत नाही.


अमेरिकेच्या आरोग्य संस्था असलेल्या 'सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन'ने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा एखादा माणूस संक्रमित पक्षी किंवा त्याच्या विष्ठेच्या संपर्कात येतो तेव्हा हा संसर्ग पसरतो. संक्रमित पक्षी ज्या ठिकाणी श्वास सोडतात त्या ठिकाणी मनुष्य उपस्थित असला तरीही संसर्ग पसरू शकतो. मात्र, हा रोग संक्रमित पक्षी खाल्ल्याने पसरत नाही.


पॅरोट फिव्हर हा आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरु शकतो. पण अशी प्रकरणं दुर्मिळ आहेत.  जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार पॅरोट फिव्हरची बहुतांश प्रकरणं घरात ठेवलेल्या संक्रमित पक्ष्यांकडून आली आहेत.


कोणाला जास्त धोका?
हा एक झुनोटिक रोग आहे, याचा अर्थ तो सुरुवातीला पक्ष्यांमध्ये पसरतो आणि मनुष्याला देखील संक्रमित करू शकतो. हा आजार पक्ष्यांच्या पिसांतूनही पसरू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे. पक्ष्यांच्या व्यवसाय करणारे आणि पक्षी पाळणाऱ्यांना या आजाराचा सर्वाधिक धोका आहे. याशिवाय पोल्ट्री कामगार, प्राणी प्रेमींनाही याचा धोका आहे. 


पॅरोट फिव्हरची लक्षणं?
पॅरोट फिव्हरच्या संक्रमणानंतर पुढय्या 5 ते 14 दिवसांमध्ये याची लक्षणं दिसू लागतात. डोकेदुखी, सुका खोकला, ताप, आणि हुडहुडी भरणं ही या आजाराची लक्षणं आहेत. अँण्टिबायोटिक्सद्वारे या आजारावर उपचार केला जातो. या आजारामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण दुर्मिळ आहे. 


या आजारापासून कसा बचाव कराल?
ज्या देशात या आजााराची जास्त प्रकरणं सापडली आहेत, त्या ठिकाणी खबरदारी बाळगण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिल्या आहेत. ज्या लोकांनी पक्षी पाळले आहेत, त्यांनी पिंजऱ्याची साफसफाई करण्याबरोबर गर्दीच्या ठिकाणी पाळीव पक्षी न ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात.