सतत पाठीत दुखणे हे हाडांच्या कॅन्सरचे मुख्य संकेत, पाठदुखीची ही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या
Bone Cancer Symptoms: हाडांमध्ये सुरू होणारा हा दुर्मिळ कर्करोग आहे. हाडांचा कॅन्सर शरीरातील कोणत्याही हाडांवर परिणाम करू शकतो. पायांच्या हाडांमध्ये सुरुवातीला याची लक्षणे जाणवतात.
Bone Cancer Symptoms: हाडांचा कॅन्सर हा एक दुर्लभ प्रकारचा कॅन्सर आहे. इतर प्रकारच्या कॅन्सरप्रमाणेच याचीही लक्षणे खूप उशीराने दिसू लागतात. हाडांमधील पेशी नियंत्रणाबाहेर गेल्यावर हाडांचा कर्करोग दिसून येतो. या प्रकारचा कॅन्सर सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येतो त्यामुळं ही चिंतेची बाब आहे. हाडाच्या कर्करोगाची लक्षणेही सामन्य असल्यामुळं त्याकडे फार लक्षही जात नाही. हाडांचा कर्करोग म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती हे जाणून घेऊया.
हाडांची गाठ जसजशी वाढत जाते तसतशी ती निरोगी ऊती नष्ट करते आणि हाडे कमकुवत करते. हाड ठिसूळ झाल्यामुळं फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. पाठीचे दुखणे हे देखील हाडांच्या कर्करोगाचे पहिले लक्षण आहे. पाठीत सतत दुखत राहिले तर विशेष म्हणजे पाठीच्या खालच्या भागात दुखत राहिले तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याआधी हाडांच्या कर्करोगाची लक्षणे जाणून घेऊयात.
हाडांमध्ये वेदना जाणवणे, सूज येणे, छोटीशी इजा झाल्यासही फ्रॅक्चर होणे, सांध्यामध्ये वेदना हे हाडांच्या कर्करोगाचे प्रमुख लक्षण आहेत. पण त्याचबरोबर पाठीत वेदना जाणवणे व पाठीच्या खालच्या भागात वेदना होणे हे देखील हाडांच्या कॅन्सरचे लक्षणे आहेत. पाठीत वेदना होण्याचे तीन संकेत आहेत. सतत पाठीत दुखत असेल आणि कितीही औषध घेऊनही त्यावर काहीच उपचार नसेल तर तुम्ही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
पाठीच्या कण्यात वेदना जाणवणे
पाठदुखी होत असेल आणि ती वेदना मणक्याजवळील विशिष्ट ठिकाणी किंवा आसपासच्या भागात होत असेल. तसंच, ही वेदना तीव्र असेल आणि कायम त्याच भागात होत असलेल्या वेदनेमुळं रोजच्या कामात लक्ष लागत नसेल तर आत्ताच डॉक्टरांसोबत संपर्क साधा.
रात्रीच वेदना होत असेल तर
हाडांचा कर्करोग असल्यास रात्री किंवा व्यायाम वा फिजिकल अॅक्टिव्हिटी कमी असल्यास जास्त वेदना होतात. तुमची पाठदुखी रात्रीच्या वेळेस जास्त त्रास देत असेल किंवा जखम किंवा मुका मारही लागलेला नसताना वेदना होत असेल तर हा चिंतेचा विषय आहे.
गाठ तयार होणे
पाठदुखीबरोबरच हाडांमध्ये सूज येणे किंवा वेदना जाणवणे याबरोबरच पाठीत गाठ तयार होणे हे देखील हाडांच्या कर्करोगाचे एक संकेत आहे. जर तुमच्या कुटुंबात कोणाला कॅन्सर असेल तर तुम्हीदेखील या संकेतांकडे दुर्लक्ष करु नका. हाडांचा कर्करोग कोणत्यही वयात होऊ शकतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)