मिटक्या मारत लोणचं खाताय; तुमची तब्येत बिघडू शकते, 5 दुष्परिणाम जाणून घ्या
Side Effects of Pickles: डाळ - भात आणि लोणचे हे कॉम्बिनेशन कोणाला आवडत नाही. पण अतिप्रमाणात लोणचं खाल्ल्याने तुमची तब्येत बिघडू शकते. कारण जाणून घ्या
Side Effects of Pickles: लोणचं भारतीयांच्या ताटातील सर्वात अविभाज्य घटक आहे. पंगत बसली की त्यात भात, भाजी, पोळी, डाळ, पापड आणि त्याबरोबर लोणचं लागतंच. पराठे आणि ठेपल्यासोबतही लोणचं छान लागतं. इतकंच काय तर, एखादी नावडती भाजी असली तरी त्यासोबत चपातीसोबत लोणचं खातात. भारतात आंबा, लिंबू याव्यतिरिक्त मिरची, गाजर, कोबी, आवळा इतकंच काय तर कोलंबीचेदेखील लोणचं बनवले जाते. पूर्वी उन्हाळ्यात लोणची घरातच घातली जायची. मात्र आता काळ बदलत गेला घरांची रचना बदलली त्यामुळं लोणची घालणे, वाळवण हे सगळे प्रकार कमी झाले. त्यामुळं बाहेरुनच लोणचं आणलं जातं. पण अतिप्रमाणात लोणचं खाण्याचे अनेक दुष्परिणामदेखील आहेत. भारतातील लोकप्रिय डायटीशियन आयुषी यादव यांनी अतिप्रमाणात लोणचं खाल्ल्यामुळं काय समस्या निर्माण होऊ शकतात हे सांगितलं आहे.
जास्त लोणचं खाण्याचे 5 नुकसान
हृदयविकार
लोणच्यात गरजेपेक्षा जास्त मीठ असते. यामुळं चव तर वाढते पण दीर्घकाळ पदार्थ साठवून ठेवण्यासही मदत होते. मीठात सोडियम आढळले जाते. जे अतिप्रमाणात खाल्ल्यामुळं उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. याचमुळं हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो.
लठ्ठपणा
लोणच्यात खूप जास्त तेल असते हे तर तुम्ही पाहिलच असेल. तेलामुळं लोणचं दीर्घकाळापर्यंत टिकण्यास मदत होते. हे तर तुम्हाला माहिती असेलच. पण जास्त तेल लठ्ठपणाचे कारण बनू शकते. ज्यामुळं पोट व कंबरेवरील चरबी झपाट्याने वाढण्यास सुरुवात होते.
पोटासाठी नुकसानदायक
लोणचं हे आल्मयुक्त असते. त्यामुळं अतिप्रमाणात व गरजेपेक्षा जास्त खाल्ल्यामुळं पोटाला नुकसान होऊ शकते. यामुळं अमाशयची स्टेलिंग वाढू शकते. ज्यात पोटात जळजळ, अॅसिडिटी आणि गॅसची समस्या होऊ शकते.
ब्लड शुगर वाढवते
लोणचं हे हाय कॅलरी डाएट आहे. त्यामुळं मधुमेहाच्या रुग्णांनी कमी प्रमाणातच लोणचं खायला हवं. नाहीतर तुमची ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते आणि तुम्ही आजारी पडू शकता.
आरोग्यासाठी वाइटच
अनेकजण बाजारातून लोणचं आणतात. ते एक प्रोसेस्ड फुड आहे जे आपल्या आरोग्याला खूप जास्त नुकसान पोहोचवते. त्यामुळं पुढे काही दुष्परिणाम होण्याआधीच आधीच काळजी घ्यावी. लोणचं हे प्रमाणातच खावे किंवा तुम्हाला तर इतकंच लोणचं आवडत असेल तर घरात तयार करा. कारण विकतच्या लोणच्यात व्हिनेगरची मात्रा अधिक असते त्यामुळंच ते दीर्घकाळ टिकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)