Weight Loss: वजन घटवण्यासाठी या डाएट टीप्सचा वापर करुन पाहाच!
वजन कमी करायचं असेल तर योग्य आहार आणि चांगला फिटनेस रूटीन तुमची मदत करू शकतो.
मुंबई : वजन कमी करायचं म्हटलं की अनेकजण उपाशी राहतात किंवा फारच कमी खाणं खातात. मात्र वजन कमी करण्यासाठी ही गोष्ट करणं फार चुकीची आहे. वजन कमी करायचं असेल तर योग्य आहार आणि चांगला फिटनेस रूटीन तुमची मदत करू शकतो. वजनासाठी हेल्दी डाएट घेण्यासाठी रोजच्या चुकीच्या सवयी तुम्ही बदलल्या पाहिजेत. त्यामुळे आज जाणून घ्या वजन घटवण्यासाठी आणि शरीर हेल्दी ठेवण्यासाठी काही सोप्या डाएट ट्रिक्स...
फळांच्या रसापेक्षा फळं खाण्यावर भर द्या
जर तुम्ही फळांचा ज्युस पिणं पसंत करता तर त्या ऐवजी तुम्ही फळं खाण्यावर भर दिला पाहिजे. फळांच्या रसापेक्षा फळं खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. यामुळे कॅलरीजचं प्रमाणंही कमी होतं. याव्यतिरिक्त, अभ्यासानुसार फळांच्या सेवनाने, टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो.
खाण्याचं प्रमाण कमी करा
बर्याचदा, आपण अधिक प्रमाणात खातो. ज्यामुळे अतिरिक्त कॅलरी आणि अनावश्यक वजन वाढू शकतं. जर आपण कमी खाण्यावर भर दिला तर अतिरिक्त कॅलरीजपासून दूर राहून वजनही कमी करता येतं.
टीव्ही पाहताना खाऊ नका, पाणी प्या
दोन्ही वेळेच्या जेवणाच्या वेळांच्यामध्ये अनेकदा आपण टीव्ही पाहता पाहता खाण्यास सुरुवात करतो. यावेळी आपण नेमकं काय खातो याकडे लक्ष नसल्याने कॅलरीजचं सेवन केलं जातं. ज्यामुळे वजन वाढतं. त्यामुळे अशावेळी तुम्ही पाणी पिण्याकडे कल ठेवा. यामुळे शरीराला पाणीही मिळेल आणि तुमची भूकंही शांत होईल.
थोड्या प्रमाणात खा
तुम्हाला असं वाटत असेल की उपाशी राहिल्याने तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल तर तुमचं चुकतंय. त्यापेक्षा तुम्ही थोड्या प्रमाणात खाऊ शकता. यामुळे तुम्ही उपाशीही राहणार नाही आणि अतिरीक्त कॅलरीज शरीरात जाणार नाहीत.