भारतात वेग-वेगळ्या भागात हर्ड इम्युनिटी विकसित होऊ शकते; वैज्ञानिकांचा अंदाज
देशात कोरोनाविरोधात हर्ड इम्युनिटी अनेक सामाजिक समूहांमध्ये, काही भागात विकसित होऊ शकते...
नवी दिल्ली : राजधानी दिल्ली आणि मुंबईमध्ये सीरो सर्व्हेक्षणातून (Sero surveys) कोरोना व्हायरसचा सामुदायिक स्तरावर बचाव होण्याच्या अपेक्षेदरम्यान संशोधकांनी सांगितलं की, देशात कोरोनाविरोधात सामूहिक रोग प्रतिरोधक क्षमता अर्थात हर्ड इम्युनिटी अनेक सामाजिक समूहांमध्ये, काही भागात विकसित होऊ शकते आणि दिर्घकाळ न टिकता कमी काळासाठी राहू शकते.
हर्ड इम्युनिटी, सामान्यपणे 70 ते 90 टक्के लोकांना एखाद्या संसर्गग्रस्त रोगाची लागण झाल्यानंतर रोग प्रतिरोधक क्षमता विकसित होते. परंतु कोरोना व्हायरसबाबत, असे अनेक मुद्दे आहेत ज्यावरील अनेक विषयांवर एकमत नाही.
वेलकम ट्रस्ट / डीबीटी इंडिया अलायन्सचे सीईओ आणि व्हायरोलॉजिस्ट शाहिद जमील यांनी सांगितलं की, लोकसंख्येच्या किती टक्के लोक हर्ट इम्युनिटी विकसित करण्यास सक्षम असतील, हे सांगू शकेल असा कोणताही स्पष्ट डेटा नाही. देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या वेळी हर्ड इम्युनिटी प्राप्त होईल.
सायन्स नावाच्या जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनात असं दिसून आलं आहे की, कोरोनाविरुद्ध हर्ड इम्युनिटी पूर्वीच्या अंदाजापेक्षा कमी संक्रमित लोकांसह देखील प्राप्त केली जाऊ शकते.
कोलकाता येथील सीएसआयआर-आयआयसीबीचे ज्येष्ठ वैज्ञानिक आणि विषाणूशास्त्रज्ञ उपासना रे यांनी सांगितलं की, 'लोकसंख्येतील किती लोक संक्रमणासाठी रोगप्रतिकारक शक्ती विकसित करतात, त्याद्वारे हर्ड इम्युनिटी निश्चित केली जाते. हर्ड इम्युनिटी लोकसंख्येच्या अशा लोकांमध्ये अप्रत्यक्ष प्रतिकारशक्ती विकसित करते ज्यांना कधीच संसर्ग झाला नाही. याचा अर्थ असा की, जितके लोक संक्रमित होतात आणि रोग प्रतिकारशक्ती विकसित करतात, त्यावेळी उर्वरित लोकसंख्येला संसर्ग होण्याचा धोका कमी असतो.'
नवी दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजी, रोग प्रतिकारशक्ती विशेषज्ञ सत्यजित रथ यांनी सांगितलं की, 'भारतात, जेथे सामाजिक-आर्थिक समूहीकरण आहे, तेथे हर्ड इम्युनिटी एकत्र विकसित होण्याऐवजी, देशाच्या निरनिराळ्या भागात हर्ड इम्युनिटी विकसित होण्याची शक्यता आहे. आणि हे फार काळ टिकू शकत नाही.'