प्रोटीन्सच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर होतात गंभीर परिणाम
प्रोटीन्स हे आपल्या आहारातील अविभाज्य घटक आहेत.
मुंबई : प्रोटीन्स हे आपल्या आहारातील अविभाज्य घटक आहेत. वजन वाढवण्यासाठी, मसल्स मजबूत करण्यासाठी आहारात प्रोटीन्सचा समावेश करणं फायदेशीर आहे. त्यामुळे आहारातील काही पदार्थांसोबतच प्रोटीन्सच्या इतर सोर्सद्वारा शरीरात प्रोटीन्सचा समावेश होतो. नियमित शरीराला एकूण कॅलरीच्या सुमारे 20-30 ग्राम प्रोटीनची गरज असते. प्रोटीन्सची गरज ही तुमचं वय, वजन आणि वर्कआऊट रूटीननुसार कमी जास्त होऊ शकते. मात्र प्रमाणापेक्षा अधिक प्रोटीन्स शरीरात गेल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
बद्धकोष्ठता -
प्रोटीन अधिक प्रमाणात शरीरात गेल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. अधिक प्रमाणात प्रोटीन खाल्ल्यास शरीरातील फायबर घटक कमी होतात. त्यामुळे पचनसंस्थेमध्ये बिघाड होऊ शकतात.
डिहायड्रेशन -
अधिक प्रोटीन घटकामुळे किडनी शरीरातून मूत्रविसर्जन करण्याचं काम दुप्पटीने करते. त्यामुळे सतत तहान लागते. वारंवार वॉशरूमला गेल्याने शरीरातून मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम घटक बाहेर पडतात. म्हणूनच प्रोटीन डाएट घेत असल्यास त्यासोबत फळं, भाज्या आणि बिन्सचा आहारातील समावेशही वाढवा.
हाडं कमजोर होणं -
अधिक प्रोटीन शरीरात गेल्यास त्याचा परिणाम हाडांवरही होतो. शरीराला कॅल्शियम घटक मिळू शकत नाहीत. यामुळे हाडं ठिसुळ होण्यास सुरूवात होते. सोबतच सांध्याचे दुखणेदेखील बळावते.
हृद्यविकार -
अधिक प्रमाणात प्रोटीनचं सेवन करणार्यांमध्ये कोलेस्ट्रेरॉलचं प्रमाण वाढतं. सोबतच सॅच्युरेटेड फॅट्स वाढतात. यामुळे हृद्याशी निगडीत काही समस्यांचा त्रास बळावण्याची शक्यता असते.