केसांच्या समस्यांवर करा घरगुती उपाय
जाणून घ्या केसांच्या समस्यांवरील घरगुती उपाय...
मुंबई : अनेकांमध्ये मोठ्या प्रमाणावर केसांच्या समस्या निर्माण होत आहेत. केस गळणे, केस अकाली पांढरे होणे, कोंडा होणे यांसारख्या समस्यांनी अनेक जण त्रस्त आहेत. केसांच्या या समस्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही होऊ शकतात. बाजारात केसांच्या समस्यांवर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र या बाजारातील पर्यांयामुळे अनेकदा रिअॅक्शन होण्याचा धोका असतो. कधी कधी हे पर्याय परवडणारेही नसतात. परंतु सुरक्षित घरगुती उपायांनी केसांच्या समस्यांवर इलाज करता येऊ शकतो. कांद्याचा रस हा केसांच्या सर्व समस्यांवर सर्वोत्तम उपाय मानला जातो. परंतु केसांसाठी गुणकारी असणाऱ्या या कांद्याचा योग्य प्रकारे वापर करणेही तितकेच गरजेचे आहे.
कांदा एक नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतो. कांद्यात पुरेशा प्रमाणात आढणारे सल्फर रक्ताभिसरण सुरळित करण्याचं काम करते. कांद्याच्या रसामुळे केसांची मुळं मजबूत होण्यास मदत होते. केसांची वाढ होते. टक्कल पडलेल्या ठिकाणी कांद्याचा रस लावणे फायद्याचे ठरते. केस गळणे आणि ड्रॅन्ड्रफच्या समस्येने हैराण असाल तर कांद्याचा रस आणि मध एकत्र मिसळून लावणे फायदेशीर ठरते. हे मिश्रण ड्रॅन्ड्रफ कमी करण्यासह केस वाढवण्यासाठीही मदत करते. कांद्याचा रस आणि मध समान प्रमाणात घेऊन केसांना लावा. एक तासांसाठी तसेच लावून ठेवा. त्यानंतर केसांच्या मुळांशी मसाज करा त्यानंतर हलक्या कोमट पाण्याने केस धुवून टाका.
बदाम तेलात असे काही तत्व आढळून येतात जे केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. बदाम तेल आणि कांद्यांच्या रसामुळे केसांना चमक येते. केस अधिक मुलायम आणि जाड होतात. बदाम तेलाऐवजी नारळाच्या तेलाचाही वापर करता येऊ शकतो. कांद्यामध्ये असणाऱ्या अॅन्टिऑक्सिडेंटमुळे केस लवकर पांढरे होत नाहीत. कांद्याच्या रसात गरम पाणी मिसळून लावल्यानेही फायदा होतो. अंड्याचा पांढरा भाग आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करुन लावल्याने केसांना पोषण मिळते तसेच केसांचे कंडिशनिंगही होते. केसांना दही आणि लिंबू एकत्र करुन लावण्याने कोंड्याची समस्या कमी होते. केळे आणि मध एकत्र करुन त्याच्या मिश्रणानेही केसांना पोषण मिळते.
हवेतील प्रदुषणामुळे केसांवरही मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे दररोज केसांची योग्य ती काळजी घ्या. ओले केस विंचरु नका. हेअर स्प्रे, जेल, कलर, ब्लिच यांसारख्या केमिकलमुळे केसांना हानी पोहचत असल्याने त्याचा वापर करु नका. केस आठवड्यातून दोन वेळा धुवा. हेअर ड्रायरचा वापर कमी करा.