मुंबई : दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढतच आहे. वाढत्या उष्णतेमुळे अनेकांना त्वचासंबंधी रोग, उष्माघात आणि इतर आजार बळावत आहेत. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढत आहे. जास्त वेळ उन्हात फिरल्याने, उभं राहिल्याने संपूर्ण एनर्जी संपून जाते. त्यामुळे चक्कर, मळमळ यांसारखे प्रकार होतात. उष्माघातामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी कांद्याचा रस सर्वोत्तम उपाय आहे. आयुर्वेदात उष्माघातावर कांद्याचा रस सर्वात प्रभावी असल्याचे सांगितले आहे. कांद्याचा रस कान, छाती आणि पायांवर लावण्याने उष्माघातापासून रक्षण करण्यास मदत होते. रोज एक चमचा कांद्याचा रस मधासोबत घेतल्यानेही उष्माघातापासून बचाव होतो.


ट्रॅडिशनल चायनिज मेडिसिननुसार, मूग डाळ उष्माघातावर अत्यंत प्रभावी मानली जाते. एक किंवा दोन कप पाण्यात मूग डाळ उकळवून घ्या. पाणी आटून अर्धे झाल्यावर गॅस बंद करून टाका. उन्हाळ्याच्या दिवसांत असे डाळीचे पाणी रोज प्यायल्याने शरीरात डिहायड्रेशन होण्यापासून बचाव होतो.


उष्माघातावर चिंचेचा रस गुणकारी ठरतो. उष्माघाताची लक्षणे वाटल्यास चिंचेचा रस घ्या. एक किंवा दोन ग्लास पाण्यात चिंचेचे दोन तुकडे उकळून घ्या. त्यात थोडी साखर किंवा मध घालून थोडं लिंबू पिळा. हे पाणी रोज घेतल्याने डिहायड्रेशनमुळे शरीरात कमी झालेली पोषकतत्वे भरून निघण्यास मदत होते. तसेच दररोज ताक, लस्सी पियाल्याने उष्माघातापासून स्वत:चे रक्षण करता येते. उष्माघाताचा त्रास अधिकच जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. 


मुंबईसह महाराष्ट्रभरात उष्णतेचा पारा ४० अंशाच्या पुढे पोहचला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हामुळे कोणताही त्रास होऊ नये त्यासाठी उष्णतेपासून बचाव करणे गरजेचे आहे. शक्यतो दुपारच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावे. बाहेर जायचे असल्यास छत्री, टोपी, गॉगल, पाण्याची बाटली घेऊनच बाहेर पडावे. त्यामुळे सर्व सावधगिरी बाळगल्यास उन्हाळ्यात सर्व आजारांपासून तसेच उष्माघातापासूनही बचाव होण्यास मदत होईल.