Reverse Vasectomy: पुरुषांची नसबंदी रिव्हर्स करता येते का? पुन्हा वडील होण्याचं सुख मिळू शकतं का?
Reverse Vasectomy Purpose Procedure Success Rate: नसबंदीसंदर्भात आजही आपल्याकडे अनेकांच्या मनात संभ्रम कायम आहे. मात्र नसबंदी म्हणजे काय? एकदा नसबंदी केल्यास पुन्हा ती रिव्हर्स करता येते का? यासारख्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
Vasectomy Reversal Operation: पुरुष नसबंदी रिव्हर्स करण्यासंदर्भातील माहिती जाणून घेण्याआधी नसबंदी म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. पुरुष नसबंदीला इंग्रजीमध्ये वॅसेक्टमी असं म्हणतात. ही एक प्रकारची छोटी शस्त्रक्रीया असते. याचा उद्देश गर्भधारणा रोखणे हा असतो. पुरुषांची नसबंदी केल्यानंतर वीर्यामधून शुक्राणू निघत नाही. म्हणजेच ज्या व्यक्तीची नसबंदी होते त्या व्यक्तीने आपल्या महिला जोडीदाराबरोबर शरीरसंबंध ठेवले तरी ती महिला गरोदार राहत नाही. मात्र नसबंदीसंदर्भात आपल्या समाजामध्ये आजही अनेक चुकीच्या संकल्पना लोकांच्या मनात कायम आहेत. मात्र नसबंदी केल्याने स्त्री आणि पुरुषामधील संबंधांमध्ये कोणताही विपरित परिणाम होत नाही. नसबंदी शस्त्रक्रीयेने पुरुषाचं पौरुषत्व कमी होत नाही.
नसबंदीमध्ये नेमकं करतात काय?
पुरुष नसबंदी एक छोटी शस्त्रक्रीया असते. ही शस्त्रक्रीया केवळ 30 मिनिटांमध्ये होते. यासाठी रुग्णालयामध्ये दाखल होण्याचीही गरज नसते. शस्त्रक्रीयेनंतर काही वेळेतच व्यक्ती घरी जाऊ शकते. या प्रक्रियेला मेल स्टॅरलायझेशन असंही म्हणतात. शस्त्रक्रीयेनंतर गुप्तांगाजवळ काही दिवस थोड्या वेदना होतात आणि सूज कायम राहू शकते. नसबंदी 100 टक्के प्रभावी असते. फार कमी प्रकरणांमध्ये नसबंदीनंतर संबंधित व्यक्तीची महिला जोडीदार गरोदर झाल्याचे प्रकार घडले आहेत. नसबंदीनंतर काही दिवस वीर्यामधून शुक्राणू म्हणजेच स्पर्म नघतात. त्यामुळे यासंदर्भात डॉक्टरांकडून अधिक सल्ला नक्की घ्यावा. तसेच अन्य गर्भनिरोधक उपायांचाही वापर या कालावधीमध्ये करता येईल.
रिव्हर्स नसबंदी करता येते का?
आता मूळ प्रश्नाकडे येऊयात रिव्हर्स नसबंदी करता येते का? म्हणजेच नसबंदी रिव्हर्स करता येऊ शकता का? नसबंदीचा निर्णय घेतल्यानंतर काही वर्षानंतर पुन्हा संततीप्राप्तीचा विचार करायचा झाल्यास ती व्यक्ती वडील बनू शकते का? तर या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे. हे शक्य आहे. याचबद्दल जाणून घेऊयात...
रिव्हर्स नसबंदी चर्चेत का?
झालं असं की, बिहारमधील कैमूर जिल्ह्यामध्ये डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे एका व्यक्तीची नसबंदी करण्यात आली. ही व्यक्ती हायड्रोसिलची शस्त्रक्रीया करुन घेण्यासाठी रुग्णालयामध्ये दाखल झाली होती. मात्र तरुणाची नसबंदी करण्यात आल्याचं समजल्यानंतर कुटुंबाला धक्काच बसला. या तरुणाने चैनपुर पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली. त्यामुळेच नसबंदी स्वइच्छेने केली असेल किंवा एखाद्या गोंधळामुळे झाली असेल तर ती पुन्हा रिव्हर्स करता येते.
जास्त गुंतागुंतीची शस्त्रक्रीया
रिव्हर्स नसबंदीसंदर्भात सांगायचं झाल्यास ज्या पद्धतीने नसबंदीची शस्त्रक्रीया केली जाते तशीच रिव्हर्स नसबंदीचीही शस्त्रक्रीया करतात. मात्र नसबंदीच्या शस्त्रक्रीयेपेक्षा रिव्हर्स नसबंदीची शस्त्रक्रीया अधिक गुंतागुंतीची असते. म्हणजेच रिव्हर्स नसबंदीमध्ये रुग्णाला जास्त त्रास सहन करावा लागतो. नसबंदीच्या शस्त्रक्रीयेमध्ये डॉक्टर टेस्टिकल्समधून वीर्याच्या माध्यमातून स्पर्म लिंगाकडे घेऊन जाणाऱ्या नसा कापून टाकतात. याला व्हास डिफरन्स असं म्हणतात. नसबंदी रिव्हर्स शस्त्रक्रीयेमध्ये तोडण्यात आलेल्या नसेचे हे दोन भाग पुन्हा जोडले जातात. असं केल्याने स्पर्म पुन्हा वीर्यामध्ये मिसळतात. रिव्हर्स नसंबंदीची शस्त्रक्रीया करणाऱ्या व्यक्तींना संततीप्राप्तीमध्ये कोणत्याही अडचणी येत नाही.
नसबंदी रिव्हर्स कशी केली जाते?
या शस्त्रक्रीयेचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारामध्ये वॅसोवॅसोक्टमी म्हणजेच डॉक्टर व्हास डिफरन्सच्या दोन्ही टोकांना पुन्हबा जोडतात. त्यामुळ पुन्हा वीर्यात स्पर्म मिसळू लागतात. दुसरी पद्धत ही वॅसोएपिडिडामोस्टमी आहे. यामध्ये डॉक्टर व्हास्ट डिफरन्सचा टेस्टिकल्सच्या मागील भागामध्ये एका छोट्या अंगाशी जोडतात. याच भागामध्ये स्पर्म जमा होतात. यापैकी दुसरी पद्धत ही पहिल्या पद्धतीपेक्षा फार किचकट आहे. पहिली पद्धत वापरणं योग्य नाही किंवा त्याचा रुग्णाला त्रास होईल असं डॉक्टरांना वाटलं तरच दुसऱ्या पद्धतीची निवड केली जाते.
सक्सेस रेट किती?
नसबंदी रिव्हर्सलच्या शस्त्रक्रीया रुग्णालयांमध्ये आणि क्लिनीकमध्ये केल्या जातात. या शस्त्रक्रीयेदरम्यान अॅनेस्थेशियाचं इंजेक्शन देऊन रुग्णाला बेशुद्ध केलं जातं. 2 ते 4 तासांचा वेळ या शस्त्रक्रीयेसाठी लागतो. ही शस्त्रक्रीया झाल्यानंतर त्याच दिवशी रुग्णाला डिस्चार्ज दिला जातो. या शस्त्रक्रीयेनंतर रुग्णाला दोन आठवड्यांपर्यंत आरामाचा सल्ला दिला जातो. नसंबंदी रिव्हर्सल शस्त्रक्रीया यशस्वी होण्याचं प्रमाण हे 60 ते 95 टक्क्यांपर्यंत असतं. या शस्त्रक्रीयेनंतर पार्टनरच्या गर्भधारणेची शक्यता 50 टक्क्यांनी वाढते. मात्र 15 वर्षांपेक्षा अधिक काळानंतर रिव्हर्स नसबंदी केल्यास ती यशस्वी होण्याची शक्यता फारच कमी असते.
शस्त्रक्रीयेनंतर किती काळाने शरीरसंबंध ठेवता येतात?
रिव्हर्स नसबंदीच्या शस्त्रक्रीयेनंतर 6 ते 12 महिन्यानंतर पुन्हा स्पर्म वीर्यात मिसळू लागतात. वॅसोएपिडिडामोस्टमीमध्ये हा कालावधी एका वर्षांचा असतो. काही लोकांना अंडाशयामध्ये ब्लीडिंगची समस्या निर्माण होऊ शकते. या माध्यमातून इन्फेक्शनचाही धोका असतो. काही लोकांना वेदना होतात. मात्र रिव्हर्स नसबंदीच्या शस्त्रक्रीयेनंतर शरीरसंबंध कधी ठेवावेत यासंदर्भातील सल्ला डॉक्टरांकडूनच घेणं योग्य ठरतं. सामान्यपणे ही शस्त्रक्रीया झाल्यानंतर 2 ते 3 आठवडे शरीरसंबंध ठेऊ नये असं डॉक्टर सुचवतात.