किडनीचं आरोग्य जपण्यासाठी फायदेशीर शेवग्याची शेंंग
प्रामुख्याने सांबारमध्ये शेवग्याची शेंग वापरली जाते.
मुंबई : प्रामुख्याने सांबारमध्ये शेवग्याची शेंग वापरली जाते. महाराष्ट्रात अनेक भाज्या, वरणामध्ये शेवग्याची शेंग टाकली जाते. यामुळे पदार्थाची चव वाढते सोबतच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. यामधील अॅन्टी टॉक्झिक घटक किडनीचं आरोग्य सुधारायला मदत करतात.
आरोग्याला फायदेशीर शेवग्याची शेंग -
मधुमेहींसाठी शेवग्याची शेंग फायदेशीर आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास किडनीवर त्याचा परिणाम होतो. हा धोका कमी करण्यासाठी, सोबतच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी शेवग्याची शेंग आहारात ठेवा.
रक्तातील घातक आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतात -
रक्तातील घातक आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी शेवग्याची शेंग मदत करते. शेंगेसोबतच त्याचा पालादेखील अॅन्टीबायोटिकयुक्त असल्याने आरोग्याला फायदेशीर ठरतो.
शेवग्याच्या पाल्याची भाजी किंवा सूप आहारात समाविष्ट केल्यास रक्त शुद्ध होण्यास त्याची मदत होते. परिणामी घातक घटकांचा किडनीवर होणारा परिणाम रोखण्यास मदत होते.
हाडं मजबूत होतात -
हाडं ठिसुळ झाल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम साचून राहण्याचा धोका असतो. जेव्हा किडनीजवळील रक्तवाहिन्यांमध्ये हा प्रकार आढळतो तेव्हा ते अधिक नुकसानकारक ठरू शकते. शेवग्याच्या शेंगेमध्ये कॅल्शियम, आयर्न आणि अन्य आवश्यक व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे हाडांना बळकटी मिळते. शेवग्याच्या शेंगेमुळे हाडांचा ठिसुळपणा रोखण्यास मदत होते.
पचन सुधारते -
पचनकार्य सुधारले म्हणजे शरीरात पोषकघटकांचे शोषण होण्याच्या कार्याला चालना मिळते. शेवग्याची शेंग आणि पाला व्हिटॅमिनयुक्त असल्याने पचनकार्याला चालना देण्यास मदत करते. कार्बोहायड्रेटेस, प्रोटीन्स आणि फॅट्स यांचं ब्रेकडाऊन होण्याच्या कार्याला चालना मिळते.