नाकाद्वारे देण्यात येणारी लस कोरोनाविरूद्ध किती प्रभावी ठरणार?
कोरोनाविरुद्धच्या युद्धाला मदत करणारी अशी ही पहिली अनुनासिक लस असणार आहे.
मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाला आता आणखी एक शस्त्र मिळालंय. जगातील पहिली अनुनासिक कोरोना लस भारतात वापरण्यासाठी मंजूर करण्यात आलीये. ही लस भारत बायोटेकने तयार केली आहे. भारत बायोटेकच्या नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी DCGI मंजूरी मिळाली आहे. कोरोनाविरुद्धच्या युद्धाला मदत करणारी अशी ही पहिली अनुनासिक लस असणार आहे.
भारत बायोटेकची ही लस आणीबाणीच्या परिस्थितीत मर्यादित वापरासाठी आहे. या लसीचे वैशिष्टय म्हणजे ही लस मास्क्यूलर लसीपेक्षा डिलीवर करणं आणि बनवणं सोपं आहे.
भारत बायोटेकच्या मते, चाचणीमध्ये 18 ते 60 वयोगटातील लोकांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये असं दिसून आलं आहे की, अनुनासिक लस स्वयंसेवकांवर प्रभावी ठरली. शिवाय याचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम झाले नाहीत.
एकदाच द्यावी लागणार ही लस
अनुनासिक लसीच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र ही लस अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार आहे, त्यामुळे या लसीची किंमतही सध्याच्या लसीच्या किमतीच्या आसपास असेल असा अंदाज लावण्यात येतो.
अनुनासिक लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात साठवली जाऊ शकते. नाकाची लस एकदाच द्यावी लागते, दोन्ही नाकपुड्यांमध्ये लसीचा एक थेंब पुरेसा असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.