उन्हाळ्याची सुट्टीत कुटुंबासोबत फिरायला जाणे, मैदानी खेळ आणि सायकलिंग करणे, ट्रेकिंग, पोहणे आणि धावणे यासारख्या क्रियांमध्ये गुंतण्यासाठी योग्य वेळ आहे.या शारीरिक क्रियांमुळे वाढलेली पाठदुखी, गुडघ्यावर तसेच खांद्यांवर येणारा अतिरिक्त ताण, फ्रॅक्चर आणि तोल जाऊन पडल्यामुळे होणाऱ्या सांध्यासंबंधीत दुखापतींचा सामना करावा लागू शकतो. या दुखापती टाळण्यासाठी तसेच कोणत्याही शारीरीक क्रियांना सुरुवात करण्यापुर्वी स्ट्रेचिंग करणे, आरामदायी कपडे परिधान करणे, योग्य पादत्राणांचा वापर करणे, हायड्रेटेड राहणे आणि कोणत्याही दुखापतीनंतर बरे होईपर्यंत पुरेशी विश्रांती घेणं महत्वाचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईच्या रूग्णालयातील ऑर्थोपेडिक्स आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. प्रमोद भोर यांनी सांगितलं की, उन्हाळ्यात ऑर्थोपेडिक दुखापतींमध्ये लक्षणीय वाढ झालीये. कारण अनेक व्यक्ती या दिवसात प्रमाणापेक्षा जास्त शारीरीक हालचाली करतात. यामध्ये पोहणे, सायकलिंग आणि जिम वर्कआउट्सपासून ट्रेकिंग, रनिंग, फुटबॉल, बास्केटबॉल, बीच व्हॉलीबॉल, टेनिस, वॉटर स्पोर्ट्स आणि क्रिकेटचा समावेश आहे. हे खेळ आरोग्य फायदेशीर आहेत, परंतु काळजीपुर्वक न खेळल्यास त्यामुळे ऑर्थोपेडिक दुखापतींचा धोका उद्भवतो. वैयक्तिक फिटनेस पातळी आणि आरोग्य स्थिती यांचा योग्य विचार न करता मोठ्या संख्येने लोक मैदानी खेळाची निवड करतायत.


डॉ. भोर पुढे म्हणाले, अशा खेळांमुळे खांदे दुखणे, गुडघेदुखी, कुर्च्याची झीज होणे, अस्थिबंधन फायणे (ACL), फ्रॅक्चर, मुरगळणे, स्ट्रेन, फॉल्स, टेनिस एल्बो, घोट्याच्या दुखापती, पाठदुखी, टाच दुखणे आणि नितंबाच्या वेदना यासारख्या समस्या उद्भवतात. ट्रेकिंग, वेट लिफ्टिंग, सुट्ट्यांमध्ये झालेल्या दुखापती, साहसी खेळ आणि हायकिंगमुळे अनेकांना पाठ, घोटा आणि गुडघ्याच्या किरकोळ दुखापतींचा त्रास होतो. पुरेशी झोप आणि व्यायाम किंवा स्ट्रेचिंग न करणे तसेच स्वतःला हायड्रेट न राखल्यामुळेही दुखापती होतात.


उन्हाळ्यात ऑर्थोपेडिक दुखापती टाळण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स: जसजसा उन्हाळा वाढत आहे, तसतसे सक्रिय राहून ऑर्थोपेडिक जखम टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. एक महत्त्वाची टीप म्हणजे कोणत्याही शारीरिक हालचालींमध्ये सहभागी होण्यापूर्वी नेहमी स्ट्रेचिंग करणे कारण यामुळे तुमचे स्नायू आणि सांधे खेळासाठी तयार होतात. याव्यतिरिक्त पुरेसा आधार आणि कुशनिंग असलेल्या योग्य पादत्राणांचा वापर करणं आणि दुखापती टाळणं गरजेचं आहे. 


दिवसभर हायड्रेटेड राहण्याचा विचार करा, विशेषत: उन्हाळ्यात आणि मैदानी खेळ खेळताना हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे. डिहायड्रेशनमुळे स्नायूमध्ये वेदना होणे आणि थकवा जाणवू शकतो, ज्यामुळे ऑर्थोपेडिक जखमांचा धोका वाढतो. आपल्या शरीराच्या आवश्यकतेनुसार विश्रांती घेणे गरजेचे आहे, ज्यामुळे शारीरीक क्रियांमध्ये पुरेशी विश्रांती आणि पुनर्प्राप्ती होऊ शकते. 


आपल्या दिनचर्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम आणि स्ट्रेचिंगचा समावेश केल्याने संपूर्ण स्नायूंची बळकटी वाढते तसेच ऑर्थोपेडिक दुखापतींचा धोका कमी होतो. सांध्यांची गतिशीलता टिकवून ठेवण्यासाठी आणि हाडांमधील ताठरपणा टाळण्यासाठी व लवचिकता वाढविण्यासाठी व्यायाम करा. या टिप्सचे अनुसरण करून आणि आपल्या शरीराच्या मर्यादा लक्षात ठेवून, सुरक्षित आणि दुखापतीमुक्त उन्हाळ्याचा आनंद घेऊ शकता.