कोरोना संकटात सोरायसिस समस्येचा असा करा सामना
योग्य तंत्रांचा वापर केला तर ऑटो-इम्युन प्रकारच्या आजाराचे व्यवस्थापन करणे शक्य
मुंबई : सर्व परिस्थिती अनुकूल असतानाही सोरायसिससारख्या समस्येचा सामना करणे खडतर असू शकते. मात्र ही गंभीर स्थिती हाताळण्यासाठी योग्य तंत्रांचा वापर केला तर ऑटो-इम्युन प्रकारच्या आजाराचे व्यवस्थापन करणे शक्य आहे. घरी असताना सोरायसिसच्या व्यवस्थापनाकडे लक्ष दिल्यास तुम्हाला आपल्या त्वचेच्या आरोग्याची दखल घ्यायला अधिक वेळ तर मिळेलच, पण त्याचबरोबर तुम्ही कोविड-१९च्या संसर्गापासूनही सुरक्षित राहू शकाल.
घरामध्ये घालविण्यासाठी हाताशी आलेल्या या लांबलचक काळामध्ये सोरायसिसच्या रुग्णांना आपल्या आजाराची लक्षणे कधी दिसतात, कधी नाहिशी होतात याचा क्रम अधिक चांगल्याप्रकारे समजून घेता येईल. ही गोष्ट एकूणच उपचारांची आखणी करण्यासाठी, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी फायदेशीर ठरू शकेल.
लॉकडाऊनच्या काळामध्ये सोरायसिसच्या रुग्णांना वैद्यकीय सल्ल्यासाठी आपल्या त्वचारोगतज्ज्ञांची भेट घेणे कदाचित शक्य होणार नाही.
'आपल्या त्वचेमध्ये काही सहज नजरेस येऊ शकतील असे बदल दिसून आल्यास त्याची माहिती आपल्या त्वचारोगतज्ज्ञास द्या. घरामध्ये अडकून पडल्याने, समाजापासून तुटल्यामुळे किंवा घर आणि ऑफिसचे काम एकत्र सांभाळण्याची अधिकची कसरत करावी लागत आल्यामुळे काही जणांच्या मनावरील ताण वाढतो आणि सोरायसिसची लक्षणे तीव्र होण्यासाठी ते एक निमित्त ठरू शकते असे सैफी हॉस्पिटल आणि प्रिन्स अली खान हॉस्पिटलच्या त्वचारोगतज्ज्ञ, रिन्यूडर्म सेंटर स्किन लेझरच्या संस्थापक आणि संचालक डॉ. शेहनाझ आरसीवाला सांगतात. म्हणूनच मन:स्थिती सकारात्मक ठेवणे हा या काळासाठीचा सर्वोत्तम सल्ला आहे. सकारात्मक विचारांमुळे तुम्हाला सोरायसिसच्या लक्षणांचे व्यवस्थापन करण्याच्या कामी मदत होईलच, पण त्याचबरोबर तुमचे एकूणच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ जपण्यासाठी ते फायदेशीर ठरेल असेही त्या म्हणाल्या.
अशी घ्या काळजी
आपल्या त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितलेल्या उपचारांचे वेळापत्रक पाळा. घरी असण्याच्या या काळाचा वापर पुरेशी झोप घेण्यासाठी करा, या काळात हलके सैलसर कपडे घाला आणि तळलेले, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाणे सोडून द्या.
अल्कोहोल-आधारित हॅण्ड सॅनिटायझर्स वापरणे टाळा कारण सोरायसिसमुळे आधीच कोरड्या झालेल्या त्वचेची स्थिती या सॅनिटायझर्समुळे आणखी वाईट होईल. सोरायसिस झालेली त्वचा चांगल्या प्रकारे वाळवणे आणि एक सौम्य क्लीन्जर योग्य प्रकारे वापरणे (कोमट पाण्याने किमान 20 सेकंद धुणे) इतके करणेही पुरेसे आहे.
फेस मास्क्स, ग्लोव्ह्ज घालणे आणि घरात रासायनिक जंतूनाशकांचा वापर करणे यामुळे त्वचेची स्थिती गंभीर होऊ शकेल, त्वचेचा कोरडेपणा वाढू शकेल व असे झाल्याने आधीच असलेली सोरायसिसची समस्या आणखी बळावू शकेल. तेव्हा मास्क आणि ग्लोव्हज वापरण्यापूर्वी आपली त्वचा नीट मॉइस्चराइज करून घ्या व तिची आर्द्रता जपा.
ओमेगा ३ आणि जीवनसत्वांनी समृद्ध फळे, हिरव्या भाज्या यांची रेलचेल असलेला आहार घ्या. सोरायसिसच्या व्यवस्थापनासाठी असा आहार लाभदायक ठरतो. सोरायसिसचा संबंध 'ड' जीवनसत्वाच्या कमतरतेशी जोडला जातो. या जीवनसत्वाच्या उणीवेमुळे सोरायसिस होत नाही, मात्र त्यामुळे त्वचा निरोगी ठेवण्याची क्षमता कमी होऊ शकते व त्यामुळ सोरायसिसची लक्षणे तीव्र स्वरूप धारण करू शकतात.
ध्यानधारणा, मन शांत करणारे श्वासाचे व्यायाम यांचा सराव करा. गरम पाण्यात शरीर बुडवून ठेवणे टाळा. त्याऐवजी कोमट पाण्यात झटपट आंघोळ करा. त्वचेची आर्द्रता टिकविण्यासाठी त्वचेवर मॉइस्चरायझरचा जाडसर थर लावा.