पावसाळ्यात टाळूला येणारी खाज कशी टाळाल?
प्रत्येक ऋतूचा आपल्या त्वचेवर आणि केसांवर परिणाम होतो.
मुंबई : प्रत्येक ऋतूचा आपल्या त्वचेवर आणि केसांवर परिणाम होतो. उन्हाळ्यात अतिघामामुळे शरीराला दुर्गंधी येते, हिवाळ्यात शुष्कता वाढते तर पावसाळ्यातही त्वचेवर खाज येणं, पायांना दुर्गंधी येणं, टाळूला खाज येण हा त्रास जाणवतो. पुरेशी स्वच्छता न पाळल्यास टाळूला खाज येते. पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात दमटपणा असतो, सूर्यकिरणांचा अभाव असतो यामुळे फंगल इंफेक्शन वाढते.
पावसाळ्यात का येते टाळूला खाज -
कोंडा - दमट वातावरणामुळे फंगसचे प्रमाण वाढते. सोबतच पावसाळ्याच्या दिवसात तेल शोषून घेण्याचं प्रमाण वाढतं. यामुळे खाज, त्वचा लालसर होणं हा प्रकार वाढतो.
केसांची पुरेशी स्वच्छता न पाळल्यास, यामुळे केसांत उवा, लिका होण्याचं प्रमाण वाढतं. यामुळे केसांमध्ये खाज वाढू शकते.
पोषक आहाराचा अभाव असल्यास टाळूवर खाज वाढू शकते.
कोणत्या उपायांनी कराल मात ?
नियमित केसांना नारळाच्या तेलाने मसाज करा. रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावा किंवा आंघोळीपूर्वी किमान अर्धा तास आधी केसांना तेल लावा.
केसांच्या समस्या टाळण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात मधाचे हेअर पॅक्स केसांना लावा. मधामध्ये नैसर्गिकरित्या मॉईश्चराईज घटक असतात. सोबतच अॅन्टी मायक्रोबियल गुणधर्म असल्याने केसांच्या समस्या आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
कोरफडीच्या गराचा टाळूवर मसाज केल्याने खाज कमी होण्यास मदत होते.
टाळूवर शुष्कता असल्यास शाम्पू आणि कंडिशनरची निवड योग्यरित्या करा. आठवड्यातून एकदा हेअर स्लाप मास्कचा वापर करा.
पावसाळ्याच्या दिवसातही आहारात योग्य प्रमाणात पाणी, हिरव्या भाज्या, फळं यांचा मुबलक प्रमाणात समावेश करा.