पावसाळ्यात डेंग्यूपासून सावधान; कसा ओळखाल डेंग्यूचा डास?
पावसाळ्याच्या दिवसांत डासांपासून पसरणाऱ्या आजारांपासून दूर राहणं महत्त्वाचं असतं.
मुंबई : अखेर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळा आल्याने उन्हाच्या तडाख्यातून सुटका होईल मात्र त्याचसोबत आजारांची सरबत्ती देखील सुरु होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत डासांपासून पसरणाऱ्या आजारांपासून दूर राहणं महत्त्वाचं असतं. या दिवसात सर्वात जास्त धोका असतो तो डासांमुळे पसरणाऱ्या डेंग्यूचा.
तर अशात प्रश्न असा असतो की डेंग्यू पसरवणाऱ्या डासांना नेमकं ओळखायचं कसं? तसं प्रत्येक डास पाहणं हे फार कठीण काम आहे. मात्र डेंग्यू पसरवणाऱ्या डासांच्याबाबतीत आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत. याद्वारे कदाचित तुम्ही अंदाज लावू शकता की तुमच्या घरात डेंग्यूचा डास आहे की नाही.
कसा असतो डेंग्यूचा डास?
ज्या डासापासून डेंग्यूचा प्रसार होतो त्या डासाचं नाव एडीस आहे. हा डास इतर डासांपेक्षा काहीसा वेगळा दिसतो. या डासावर चित्त्यासारखे पट्टे दिसून येतात. या डासांच्या पायावर पांढऱ्या चट्टे असतात. त्याचप्रमाणे असं मानलं जातं की, प्रकाशामध्ये आणि खासकरून सकाळच्या वेळेस हे डास चावण्याची शक्यता अधिक असते.
इतर डासांच्या तुलनेत हे डास काहीसे छोटे असतात. यामध्ये मादी डासांचा समावेश अधिक असतो. थंडीच्या दिवसांत हे डास अधिक वेळ जिवंत राहू शकत नाहीत. काही अहवालांनुसार असं समोर आलं आहे की, एडीस इजिप्ती हा डास जास्त उंचीपर्यंत उडू शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या गुडघ्यापर्यंतच हा डास उडून पोहोचू शकतो. त्यामुळे पावसाळाच्या दिवसांत पाय झाकले जातील असे कपडे जरूर घालावेत.
डेंग्यूचा ताप कसा ओळखावा?
डेंग्यूचा डास चावल्यावर तातडीने डेंग्यूची लक्षणं दिसून येत नाहीत. जवळपास 3-5 दिवसांनी तापाची लक्षणं दिसून येतात. या तापामध्ये डोळे लाल होणं त्याचप्रमाणे त्वचेचा रंग काहीसा लाल झाल्याचं दिसून येतं. डेंग्यूचा ताप 2-4 दिवसांपर्यंत राहतो. हा ताप आल्यावर शरीरात रक्ताची कमी निर्माण होऊन संबंधित व्यक्तीला चक्कर येण्याची तक्रार उद्भवू शकते.