एएमएच पातळी गर्भधारणेसाठी कितपत उपयुक्त ठरते? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात?
मुलगी जन्माला आल्यापासून पाळी सुरू होइपर्यंत या अविकसित स्त्रीबीजांची संख्या भरपूर असते. नंतर मात्र ही संख्या कमी होण्यास सुरुवात होते. साधारणपणे स्त्रीची पाळी थांबेपर्यंत ओवरीत असलेली स्त्रीबीजे तिला पुरतात
एएमएच चाचणी ही रक्तातील अँटी-म्युलेरियन संप्रेरक (AMH) चे प्रमाण निश्चित करण्याच्या उद्देशाने काम करते. ही चाचणी स्त्री आणि पुरुष दोघांनाही लागू होते. महिलांमध्ये या चाचणीचा उपयोग त्यांच्या अंडाशयाच्या राखीवतेचे मूल्यांकन करण्यासाठी करतात. गर्भधारणेच्या प्रक्रियेत अंडाशय म्हणजे ओवरीत पुरेशी स्त्रीबीजे असणे अत्यावश्यक आहे.
मुलगी जन्माला आल्यापासून पाळी सुरू होइपर्यंत या अविकसित स्त्रीबीजांची संख्या भरपूर असते. नंतर मात्र ही संख्या कमी होण्यास सुरुवात होते. साधारणपणे स्त्रीची पाळी थांबेपर्यंत ओवरीत असलेली स्त्रीबीजे तिला पुरतात पण काही स्त्रियांमध्ये ही स्त्रीबीजांची संख्या खूप झपाट्याने कमी होते. आणि त्यामुळे जननक्षमता कमी होऊ लागते.
मुंबईतील फर्टिलिटी कन्सल्टंट डॉ. रितु हिंदुजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांमध्ये शुक्राणूंचा पुरवठा मर्यादित नसतो, तर स्त्रीबीजामध्ये मर्यादित संख्येत अंडी असतात. एकदा स्त्रीची अंडी संपली की, तिला गर्भधारणेसाठी विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे, महिलांनी गर्भधारणेची योजना आखत असल्यास त्यांच्या एएमएच पातळीचे मूल्यांकन करणे महत्वाचे आहे.
डॉ. रितु हिंदुजा पुढे म्हणाल्या, तीस पूर्ण होण्याच्या आत गर्भधारणा प्लॅन करणे उत्तम पण काही कारणाने ते शक्य नसेल तर मग निदान AMH ही तपासणी करून जननक्षमतेचा अंदाज घेणे संयुक्तिक आहे. मात्र गर्भधारणेच्या बाबतीत स्त्रीचे वय हा सर्वात महत्वाचा आणि मोठा घटक आहे ही गोष्ट लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या स्त्रीला परिस्थितीमुळे गर्भधारणा शक्य नसेल तर IVF तंत्रज्ञान वापरून स्त्रीबीजे काढून घेऊन गोठवून ठेवणेही आजकाल शक्य आहे. तरुण वयात झालेल्या कॅन्सरच्या उपचारांमुळे ओवरी आणि स्त्रीबीजे यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असेल अश्या केसेस मध्ये सुद्धा स्त्रीबीजे गोठवणे शक्य आहे. अशी स्त्री तिच्या सोयीनुसार नंतर गर्भधारणा प्लॅन करू शकते.
ही चाचणी अंड्याच्या उरलेल्या प्रमाणाबद्दल माहिती देते, परंतु अंड्याच्या गुणवत्तेबद्दल कोणतीही निश्चित माहिती देत नाही. एएमएच पातळीत मासिक पाळीच्या दरम्यान जास्त चढ-उतार होत नाही. या कारणास्तव,ही चाचणी कधीही केली जाऊ शकते. कमी एएमएच तुम्हाला गर्भवती होण्यापासून रोखत नाही.
एएमएच चाचणीचा फायदा काय?
डॉ. रितु हिंदुजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एएमएच चाचणी ही प्रजनन क्षमता तपासण्याचा आणि गर्भधारणेची योजना आखण्यासाठी योग्य ठरते. महिलेच्या गर्भाशयातील गुणवत्तापूर्ण बीजांडाच्या पेशींची संख्या दर्शविण्यासाठी देखील याचा उपयोग केला जाऊ शकतो अथवा गरोदरपणात महिलेची बीजांडे तयार करण्याची क्षमता यावरून फलित होऊ शकते.
या चाचणीमध्ये २-४.५ एनजी/एमएल ही सामान्य एएमएच पातळी मानली जाते. ही पातळी २ एनजी/एमएलपेक्षा कमी असेल, तर त्याला कमी एएमएच पातळी म्हणतात आणि १.५ एनजी/एमएलपेक्षा कमी झाल्यास त्याला निम्न एएमएच पातळी म्हणतात. २ एनजी/एमएलपेक्षा कमी पातळी असल्यास पुढील उपचारासाठी सल्ला देण्यात येतो. केवळ एएमएचची पातळीच नाही, तर रुग्णाचे वय, एन्ट्रल फॉलिकल काउंट (एएफसी) चाचणी अशा तीनही गोष्टींचा एकत्रित अभ्यास करून गर्भधारणेच्या शक्यतेचा अंदाज तज्ज्ञ बांधू शकतात. जर एन्ट्रल फॉलिकल काउंट देखील कमी असेल, वय जास्त असेल आणि एएमएच पातळी १, ०.५ एनजी/एमएलपेक्षा कमी असेल, तर अशा व्यक्तीमध्ये नैसर्गिक उपचाराने होणाऱ्या यशाचे प्रमाण कमी असते. कारण, नैसर्गिक उपचारांमध्ये एक-दोन अंडी तयार करण्याचे लक्ष्य असते. अशा रुग्णांसाठी डॉक्टर इन विट्रोफर्टिलायझेशनचा (आयव्हीएफ) सल्ला देऊ शकतात.