मधुमेहींना नियमित अक्रोड खाण्याचा होतो एक मोठा फायदा
मधुमेह हा एक गंभीर आजार आहे.
मुंबई : मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. मधुमेहाच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्यामधून एकातून दुसरा त्यातून तिसरा आजार बळावण्याची शक्यता असते. म्हणूनच मधुमेहाच्या रूग्णांना त्यांच्या पथ्यपाण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचे असते. भारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. मधुमेहाच्या रूग्णांना व्यायाम, आहाराचे पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. अशामध्ये मधुमेहींनी नेमके काय खावे हा प्रश्न असतो.
संशोधकांचा दावा
अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अहवालानुसार, नियमित 3 चमचे अक्रोड खाल्ल्याने टाईप 2 डाएबेटीसचे प्रमाण 47 % पर्यंत कमी झाल्याचा दावा केला आहे. यामध्ये 28 ग्राम म्हणजेच सुमारे 4 अक्रोड खाण्याचा सल्ला दिला आहे.अक्रोड नियमित खाणार्यांच्या तुलनेत ते न खाणार्यांमध्ये मधुमेह (टाइप 2 डायबिटीज) जडण्याचा धोका कमी होतो.
संशोधन काय सांगते ?
अमेरिकन नागरिकांमध्ये करण्यात आलेल्या प्रयोगामध्ये 18-85 वयोगटातील 34,121 लोकांवर हा प्रयोग करण्यात आला आहे. या प्रयोगाच्या निष्कर्षानुसार, मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी आहाराचे पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. आहारात अक्रोडचा समावेश केल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते.
अक्रोडचा आकार मेंदूप्रमाणे असल्याने मेंदूच्या कार्याला चालना देण्यासाठी आहारात त्याचा वापर करावा असे सांगितले जाते. मात्र त्यासोबतच शरीराला बळकटी मिळावी म्हणून, त्वचा विकार, घशातील खवखव, किडनी स्टोन आणि पोट साफ करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरतो. अक्रोडमध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात.