घरातला `इडियट बॉक्स` वाढवतोय तुमचा लठ्ठपणा
घरातला छोटा पडदा तुमचं मनोरंजन करत असला तरी टीव्ही तुमच्या आरोग्याला मारक ठरू लागलाय
कपिल राऊत, झी २४ तास, ठाणे : टीव्हीचे अनेक दुष्परिणाम तुम्हा आम्हाला माहिती आहेत. पण हा टीव्ही आता अधिक धोकादायक होऊ लागलाय. टीव्ही पाहण्य़ामुळे लठ्ठपणा वाढीस लागत असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. पूर्वी तुमच्या घरात टीव्ही कोणता आहे आणि तो किती मोठा आहे यावर तुमच्या श्रीमंतीचं मोजमाप केलं जायचं. पण आता ते दिवस सरलेत. आता तुम्ही किती वेळ टीव्ही पाहता यावरून तुमचं 'वजन' ठरवलं जाण्याची शक्यता आहे.
एका संशोधनात सतत टीव्हीसमोर राहणाऱ्या लोकांना लठ्ठपणा येऊ शकतो, असा निष्कर्ष काढण्यात आलाय. सतत टीव्ही पाहण्याच्या सवयीमुळे लोकांची शारीरिक हालचाल मंदावू लागलीय. टीव्हीतून येणारा प्रकाशही शरिराला घातक असतो. शिवाय टीव्हीसमोर बसून खाण्याची सवयही वाढलीय. काही लोकं तर झोप येईपर्यंत टीव्ही पाहतात. या सवयी लठ्ठपणाला निमंत्रण देणाऱ्या असल्याचे निष्कर्ष या संशोधनातून समोर आलेत.
घरातला छोटा पडदा तुमचं मनोरंजन करत असला तरी टीव्ही तुमच्या आरोग्याला मारक ठरू लागलाय. त्यामुळं कमीत कमी वेळ टीव्ही पाहा. काही वेळासाठी मनोरंजन ठिक आहे पण दिवसभर टीव्हीसमोर बसणं कधीही आरोग्यासाठी घातक आहे. घरातलं काम बाजुला ठेवून टीव्हीसमोर बसण्याऐवजी कामाला लागा... अन्यथा हा 'इडियट बॉक्स' तुम्हाला लठ्ठपणा आणि त्या सोबतीचे आजार देऊन जाईल.