परदेशातून कोणी येणार असाल तर आताच सावध व्हा!
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोरोना टेस्ट वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
मुंबई : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरुवात करण्यात आली असून सर्वोतपरी प्रयत्न केले जातायत. असं असताना आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोरोना टेस्ट वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
ख्रिसमस सणाच्या निमित्ताने परदेशात भारतीय जातात. मात्र, सध्या परदेशातील काही देशांमध्ये कोविडच्या नव्या स्ट्रेनची लाट पसरली आहे. त्यामुळे, परदेशातून मुंबईत येणाऱ्या भारतीयांचं स्क्रिनिंग आणि टेस्टिंग सुरु करण्यात आलं आहे. जेणेकरून कोरोनाला आळा घालण्यास मदत होईल.
मुंबई शहरात नवीन कोविड स्ट्रेन दाखल होण्याआधी पालिकेकडून वॉर्डच्या आरोग्य विभागात चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हजारो मुंबईकर काम, शिक्षण तसंच नोकरीच्या निमित्ताने परदेशात जातात. हे परदेशी भारतीय आगामी येणाऱ्या ख्रिसमस आणि वर्षाअखेरच्या आठवड्यात सुटीच्या निमित्ताने भारतात परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारा धोका लक्षात घेता कोरोना टेस्ट वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईत 14 हजार बालकांना कोविड
9 वर्षांखालील मुलांना कोविडची लागण झाल्याचं निदर्शनास आलं आहे. मुंबईत 14 हजार लहान मुलांना कोरोना झाल्याचं उघड झालं आहे. मुंबईत 9 वर्षांखालील लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आल्यावर मुलांच्या लसीकरण चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. मात्र यासाठी मुलांचे पालक फारसा पुढाकार घेत नसल्याचंही समोर येतंय.