Symptoms of Blocked Arteries: आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्या मागे लागतायत. यापैकी एक समस्या ती म्हणजे हृदयविकाराची. सध्याच्या काळात केवळ वयस्कर व्यक्ती किंवा प्रौढ व्यक्ती नव्हे तर तरूणांना देखील हृदयविकाराचा झटका येतो. गेल्या काही काळापासून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. हृदयविकाराचा झटका येण्याचं सर्वात मोठं कारण हृदयाच्या आर्टरीज म्हणजे धमन्यांमधील ब्लॉकेज असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धमन्या या रक्तवाहिन्या आहेत ज्या तुमच्या हृदयाला रक्त आणि ऑक्सिजन पोहोचवतात. ज्यावेळी रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होतो त्यावेळी ते रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. परिणामी यामुळे रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयापर्यंत पोहोचत नाही. अशावेळी हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाशी संबंधित इतर आजार होऊ शकतात. हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यामुळे शरीरात अनेक प्रकारची लक्षणं दिसू शकतात. ही लक्षणं कोणती आहेत ते जाणून घेऊया. 


जास्त थकवा येणं


सतत थकवा येणं हे देखील हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेजचं लक्षण असू शकतं. निरोगी आहार घेतल्यानंतर आणि पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही जर तुम्हाला सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणी करून घ्या.


छाती दुखणं


छातीत दुखणं किंवा बैचेन वाटंणं हे हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेजचे लक्षण मानलं जातं. जर तुम्हाला वारंवार छातीत दुखणं, छातीत जडपणा किंवा जळजळ होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. यावेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरणार आहे


श्वास घेण्यास त्रास होणं


हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज असल्यास श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता बळावू शकते. यावेळी जेव्हा रक्तप्रवाह नीट होत नाही, तेव्हा पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन शरीरात पोहोचत नाही. अशामध्ये श्वास घेण्यास त्रास होण्याची दाट शक्यता असते. अशा परिस्थितीत तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.


प्रचंड घाम येणे


जास्त प्रमाणात घाम येणं हे देखील हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेजचं एक लक्षण असू शकतं. जर तुम्हा कोणत्याही कारणाशिवाय जास्त घाम येत असेल तर त्याला सामान्य परिस्थिती समजू नका. 


चक्कर येणं 


हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेजमुळे, वारंवार चक्कर येण्यासोबतच बेशुद्ध होण्याची समस्या दिसून येत असेल तर हे रक्त प्रवाहाच्या कमतरतेमुळे होऊ शकतं. अशा परिस्थितीत तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)