नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा मोठा धोका निर्माण झाला असून याच्या संसर्गामुळे मृतांच्या आकड्यात सतत वाढ होत आहे. भारतसह अनेक देश लॉकडाऊन करण्यात आले असून कोरोनापासून वाचण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना, गाईडलाईन्स जाहीर केल्या जात आहेत. कोरोनाबाबत, त्याच्या परिणामांबाबत लोकांमध्ये अनेक प्रकारच्या शंका आहेत. अशातच धुम्रपान किंवा तंबाकूमुळे कोरोनाचा धोका अधिक आहे? असा प्रश्नही लोकांमध्ये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, धुम्रपान करणाऱ्यांमध्ये इतरांच्या तुलनेत संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. याचं सर्वात मोठं कारणं सिगारेट किंवा बिडी, जी संक्रमित असल्यास बोटं आणि होटांच्या थेट संपर्कात येते. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. त्याशिवाय, हुक्का, सिगार किंवा ई-सिगारेट वापरणाऱ्यांसाठीही हा धोका ठरु शकतो.


अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ड्रग ऐब्यूजच्या डायरेक्टर डॉ. नोरा वॉलकोव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हायरस थेट फुफ्फुसांवर हल्ला करतो, त्यामुळे धुम्रपान करणाऱ्यांसाठी हा मोठा धोका ठरु शकतो. धुम्रपान केल्याने फुफ्फुसांच्या पेशी कमकुवत होतात, त्यामुळे त्यांच्यात इन्फेक्शनशी, व्हायरसशी लढण्याची ताकद कमी होते.


कोरोनाच्या रुग्णांचे धुम्रपानाशी संबंधीत कोणतेही आकडे समोर आले नाहीत. मात्र या कोरोनाच्या भयंकर विळख्यात आरोग्य तज्ञ लोकांना धुम्रपान न करण्याचा सल्ला देत आहेत.