मुंबई : डिजिटल युगात फोनचा वापर वाढला आहे. लहानातल्या लहान कामासाठी आपण फोनचा वापर करु लागलो आहोत. इतकंच काय तर अभ्यास करण्यासाठी देखील फोनचा वापर वाढला आहे, ज्यामुळे अगदी लहान मुलं देखील फोनचा वापर करत आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत लोक फोन वापरतात, अगदी काळोख झाल्यानंतर देखील अनेक तरुण मंडळी आपल्या चादरीच्या आत फोन वापरतात. परंतु तुम्हाला माहितीय का की, रात्रीच्या अंधारात फोनचा प्रकाश तुमच्या डोळ्यांना इजा पोहोचवू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता यावर तुम्ही म्हणाल की, आम्ही तर फोनचा स्क्रिन ब्राइटनेस अगदी लोक करतो, मग आमच्या डोळ्यांना त्या प्रकाशाचा त्रास होणार नाही. पण तुम्ही खूप चुकीचा विचार करताय. कारण फोनचा अगदी कमी ब्राइटनेस देखील तुमच्या डोळ्यांवर ताण आणत आहे. आता हे कशामुळे बोललं जातंय? आणि मग असं असेल तर, स्क्रीनची ब्राइटनेस नक्की ठेवायचा तरी किती?


दिवसाच्या प्रत्येक परिस्थितीत वेगवेगळा ब्राइटनेस ठेऊन डोळ्यांची समस्या टाळता येते. तर जाणून घ्या निरोगी डोळ्यांसाठी फोनचा ब्राइटनेस किती असावा...


तुमच्या गॅझेटची ब्राइटनेस खूप कमी असेल तर ते तुमच्या डोळ्यांवर दबाव टाकते. याचे कारण असे की, या स्थितीत डोळ्यांना फोनमधील गोष्ट वाचण्यासाठी किंवा पाहाण्यासाठी जास्त लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, त्यामुळे डोळ्यांचा ताण वाढतो. तसे पाहाता यामुळे दीर्घकालीन नुकसान होत नाही, परंतु डोकेदुखीचा त्रास मात्र नक्की वाढतो.


मग जास्त ब्राइटनेस ठेवायचा का?


आता फोनचा ब्राइटनेस कमी ठेवणे ही योग्य सवय नाही, मग फोनचा ब्राइटनेस जास्त ठेवावा का? यावरही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नाही तणावापासून डोळ्यांचे रक्षण करण्याचा हा योग्य मार्ग नाही.


जर तुमच्या फोनची ब्राइटनेस 50% पेक्षा जास्त असेल, तर तुमच्या डोळ्यांना  नुकसान होण्याचा धोका आहे. यामुळे डोळ्यांवर ताण, डोळ्यांची जळजळ आणि डोळे कोरडे होणे इत्यादी समस्या वाढतात.


मग योग्य पद्धत कोणती?


तुमच्या फोनची ब्राइटनेस किती असावी, हे तुम्ही जिथे आहात तिथील आजूबाजूच्या प्रकाशावर अवलंबून आहे, असे तज्ञांचे मत आहे. फोनचा प्रकाश त्या प्रकाशाच्या आधारावर असावा. अशा परिस्थितीत तुम्ही हा नियम पाळू शकता की, तुमच्या आजूबाजूला जेवढा प्रकाश आहे तेवढाच प्रकाश तुमच्या फोनवरही असला पाहिजे.


म्हणजेच तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार फोनचा ब्राइटनेस ठेवावा. उदाहरणार्थ, जर रात्रीची वेळ असेल तर शक्य तितका प्रकाश कमी करा आणि दिवसा फोनची चमक वाढवा. परंतु तुमच्या खोलीत थोडासा प्रकाश असेल, तर तुम्ही फोनचा ब्राइटनेस संपूर्ण कमी करु नये. त्यामुळे तो तुमच्या सभोवतालच्या अंधार आणि प्रकाशानुसार सेट करावा.