Heart attack: दिवसेंदिवस तरुणांमधील हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण एक चिंतेचा विषय ठरतोय. पुर्वी प्रौढांमध्ये आढळून येणारी ही समस्या हल्ली वृद्ध तरुणांमध्ये अधिक प्रमाणात पहायला मिळते. तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची संख्या वाढतेय. बदलती  जीवनशैली हे या मागचे मुख्य कारण ठरत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या रूग्णालयातील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ.समीर व्ही पगड यांच्या म्हणण्याप्रमाणे, अनुवांशिक स्थिती आणि अंतर्निहित आरोग्य परिस्थितीकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. हृदयविकाराच्या सुरुवातीच्या काळात तणाव आणि मानसिक आरोग्य हे देखील महत्त्वाचे कारण ठरलं आहे. यासंबंधीत गुंतागुंत कमी करण्यासाठी तरुण वयातच नियमित आरोग्य तपासणी करणं गरजेचं आहे. निरोगी सवयींचे पालन करणं महत्त्वाचं ठरतंय.


हृदय विकाराच्या झटक्याची लक्षणं कोणती?


लक्षणांमध्ये छातीत अस्वस्थता, दम लागणे आणि तीव्र थकवा यांचा समावेश असू शकतो. जबड्यासंबंधीत वेदना, पाठीच्या वरच्या बाजूस होणाऱ्या वेदना आणि मळमळ यांसारखी लक्षणे हृदयविकाराचा झटका दर्शवू शकतात. या सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करु नका तसेच ही लक्षणे आढळताच त्वरित वैद्यकीय मदत घ्यायला विसरु नका. 


डॉ.समीर पुढे म्हणतात की, जीवनशैलीतील घटक जसे की तणाव, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे तरुणांमधील हृदयविकाराचा धोका वाढला आहे. हृदय निरोगी राहण्याकरिता नियमितपणे व्यायाम आणि हृदयासाठी निरोगी आहाराचे सेवन करा. तरुणांमधील हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे ओळखण्यासाठी त्याविषयी जागरूकता महत्त्वाची आहे.


प्रतिबंध कसा कराल?


हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी नियमित शारीरिक हालचालींना प्राधान्य देणे आणि आठवड्यातून किमान पाच दिवस व्यायाम करणे गरजेचे आहे. चालणे, पोहणे किंवा सायकल चालवणे यासारख्या विविध प्रकारच्या एरोबिक क्रियांचा समावेश केल्याने केवळ हृदयाचे स्नायू मजबूत होत नाहीत तर वजन देखील नियंत्रित राखण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. 


निरोगी हृदयासाठी फळे, भाज्या, तृणधान्य आणि प्रथिनयुक्त आहार घेणं आवश्यक आहे. अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेल्या अन्नाचे सेवन केल्याने जळजळ कमी होण्यास मदत होते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांपासून संरक्षण होते. ध्यान किंवा योगसाधना हे तणावाचे  व्यवस्थापन करण्यास मदत करतात. हे लक्षात ठेवा की तणाव हे हृदयाच्या समस्यांच्या विकासास कारणीभूत ठरते. म्हणून तणावाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.